ठाणे: कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेला सहकार्य न करण्याची भूमिका सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली हाेती. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे. कल्याण लाेकसभा निवडणूक लढवण्याची काेणाची तरी इच्छा असू शकते. मात्र युतीमुळे ही इच्छा पूर्ण हाेऊ शकत नसल्यानेच ही भूमिका पुढे आली असावी, असा टाेला चव्हाण यांचे नाव न घेता म्हस्के यांनी शुक्रवारी लगावला.
वरिष्ठ पातळीवर युती भक्कम असून त्यावर अशा गोष्टींचा परिणाम होणार नसून ठाणे आणि कल्याण लोकसभा शिवसेनाच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिव्यात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण यांना वगळले होते. त्यामुळे चव्हाण हे कार्यक्रमालाही हजर नव्हते. त्यानंतर गुरुवारी कल्याण लोकसभेसाठी भाजपची बैठक झाली. त्यात डोंबिवलीच्या प्रकरणातील संबंधित वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याची बदली हाेईपर्यंत कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य करायचे नाही, असा ठराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. त्यावर म्हस्के यांनी तोंडसुख घेतले आहे.
भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली आहे. त्यात संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली करायची किंवा कसे हा गृहखात्याचा विषय असल्याचे म्हस्के सांगितले. तर अशा पद्धतीने ठराव करताना फडणवीस, बावनकुळे यांची परवानगी घेतली आहे का? असा सवालही त्यांनी केला. जे काही झाले असेल त्याचा कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसे असेल तर बंद खोलीत चर्चा होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठच यावर योग्य तो तोडगा काढतील, असेही म्हस्के म्हणाले.
शिवसेनाही निरीक्षक नेमणार
भाजपने लोकसभा आणि विधानसभेसाठी निरीक्षक, संयोजक नेमले आहेत. शिवसेनाही संपर्कप्रमुख, संयोजक, निरीक्षक नेमणार असल्याचे त्यांनी सांगितले. १३ जूनला लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक हाेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, जेथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तेथे भाजपचे निरीक्षक त्यांना मदत करतील. तर भिवंडी हा भाजपकडे असल्याने तेथे शिवसेना त्यांना सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.