ठाणो : सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाला पर्याय राहिला नाही, पण काळानुरूप बदलत जाणारे शिक्षण झाले पाहिजे. शिक्षक व्यवसायार्थी आणि विद्यार्थी परीक्षार्थी झालेला आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे, असे मत केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात परखडपणे मांडले.
येथील एम.एच. हायस्कूलमधील सभागृहात रविवारी शिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रचलित शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज व्यक्त केली. देशाची जडणघडण करणारा विद्यार्थी घडवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. यासाठी विद्यार्थी सक्षम आहे, पण त्यातील अनावश्यक भाग काढला, तर निश्चितच तो घडला जाईल. मूर्ती घडवताना दगडावरील अनावश्यक भाग काढून टाकला जात असल्याचे त्यांनी पटवून दिले.
यावेळी अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याचे भान करून दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी कोरोनाकाळातील शिक्षकांच्या कौतुकास्पद कामगिरीसह लसीकरण आणि साहित्य निर्मितीच्या कामांचेही कौतुक केले. गेल्या काही वर्षांतील रखडलेले कामे पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट करून विशेष शिक्षक व विकल्पधारक शिक्षकाची समस्याही लवकरच सोडवण्यात येणार आहे. याशिवाय वेळेवर वेतन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दांगडे यांनी सांगितले.
.......