धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका आणि लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्यसुविधेबाबत किती उदासीन आहेत, याचा आणखी एक भन्नाट प्रकार समोर आला आहे. महापालिकच्या भाईंदर येथील जोशी, तर मीरा रोड येथील गांधी रुग्णालयात केसपेपर संपलेले असताना ते छापून देण्यातही कमालीचा हलगर्जीपणा केला जात आहे. त्यामुळे कोºया कागदांवर रबरी शिक्का मारून त्याचा वापर केसपेपर म्हणून करण्याची नामुश्की पालिकेवर ओढवली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात रोजचे सुमारे ३०० ते ३५० बाह्योपचार रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय, प्रसूतिगृह व प्राथमिक उपचारासाठी रुग्ण दाखल होत असतात. मीरा रोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयातदेखील रोज सुमारे २०० ते २५० बाह्योपचार रुग्ण येत असतात. येथेदेखील प्रसूतिगृहासह अन्य उपचार चालतात. याशिवाय, पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात.
जोशी रुग्णालयाची इमारत मोठी आणि पोकळ वासा अशी गत आहे. शस्त्रक्रियागृह नाही, आयसीयू व एनआयसीयू नसून, आवश्यक तपासणी यंत्रणा आणि आवश्यक डॉक्टरही नाहीत. पालिकेने या आवश्यक सोयीसुविधाच दिल्या नसल्याने आतापर्यंत अनेकांचे बळी या रुग्णालयात गेले आहेत. शासनानेदेखील पालिकेने आवश्यक सुविधा दिल्या नसल्याने रुग्णालय चालवण्यास नकार दिला आहे. मानवी हक्क आयोगाने पालिकेला नोटीस बजावून दावा चालवला आहे.
मीरा रोडच्या रुग्णालयाची स्थितीदेखील वेगळी नाही. त्यातच कहर म्हणजे रुग्णालयात लागणारे साधे केसपेपरसुद्धा पालिका देण्यास टाळटाळ करत आहे. गेल्या वर्षीच केसपेपर संपायला आल्याचे भांडार विभागाला कळवून नवीन केसपेपर वैद्यकीय विभागाने छापून मागितले होते. परंतु, प्रशासनाने आवश्यक बाब असूनही वेगवेगळ्या कारणांनी केसपेपर छापून देण्यास चालढकल केली.
जानेवारीअखेरीसपासून रुग्णालयातील केसपेपर संपले. तेव्हापासून वैद्यकीय विभागाकडून जोशी रुग्णालयातील झेरॉक्स मशीनवर केसपेपरची झेरॉक्स छापून चालढकल केली जात नाही. त्यासाठी वैद्यकीय विभागाने भांडार विभागाकडून अनेकवेळा कोºया कागदांच्या रीम मागितल्या असता त्यादेखील देण्यात आल्या नाहीत. शेवटी, वैद्यकीय विभागानेच कोºया कागदांच्या रीम खरेदी करून झेरॉक्स केसपेपर देण्याचा पर्याय निवडला. पण, झेरॉक्स मशीन १० दिवसांपूर्वीच बंद पडल्याने रुग्णांनाच बाहेरून झेरॉक्स काढून आणायला सांगितले जाऊ लागले. पण, त्यावरून रुग्णांची गैरसोय व वाद होऊ लागले. कागददेखील संपले. त्यामुळे केसपेपरच देणे बंद करण्याची नामुश्की ओढवल्याने अखेर भांडार विभागाने काही कोरे कागद पुरवले. त्यावर आता पालिकेचा शिक्का मारून केसपेपर म्हणून त्यांचा वापर करावा लागत आहे. साधे केसपेपर छापण्यासाठी पालिकेने दाखवलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे पालिकेची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली आहेत.
याप्रकरणी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भांडार विभागाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी, तर आपल्याला याची माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तथा पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती डॉ. राजेंद्र जैन यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता आपण आता व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
केसपेपर गेल्या काही महिन्यांपासून छापून न देणे ही लाजिरवाणी बाब असून, या प्रकरणात पालिकेच्या बदनामीस कारणीभूत ठरणाºया बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी. तातडीने केसपेपर छापून द्यावेत, असे आयुक्तांना सांगणार आहे. - प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना
सत्ताधाºयांना आरोग्यसेवेशी सोयरसुतक नाही. यांना पालिकेतील दालने आलिशान करण्यासाठी पाहिजे तसा पैसा उधळायला मिळतो. पण, साधा केसपेपर छापून देण्याची यांची दानत नाही. रुग्णालयात आयसीयू, ऑपरेशन थिएटर यांना बांधता येत नाही. - संगीता जगताप, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
महापालिकेने नागरिकांच्या वैद्यकीय सुविधेकडे नेहमीच दुर्लक्ष चालवले आहे. आयसीयू नाही, शस्त्रक्रियागृह नाही. लोकांकडून इतका कर वसूल करता, तर मग त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा द्यायला नको का? लोकांना वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यातच साधे केसपेपरसुद्धा पालिका छापून देत नसेल, तर हा निर्लज्जपणाचा कळसच म्हटला पाहिजे. - सारा अक्रम, नगरसेविका, काँग्रेस