ठाणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा गुरुवारी ठाण्यात आयोजित केली होती. त्यासाठी ते ठाण्यात आलेही होते; परंतु सभास्थळी जाण्याचे टाळून त्यांनी थेट मुंबईकडे उड्डाण केले. तब्येतीचे कारण देऊन त्यांच्या नेत्यांनी सारवासारव केली असली, तरी प्रत्यक्षात सभास्थळी गर्दीच झाली नसल्याने त्यांनी त्याठिकाणी जाणे टाळल्याची माहिती समोर आली आहे.बुधवारी बदलापूरमध्ये आंबेडकर यांची सभा होती. परंतु, त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने त्याठिकाणी सभा झाली नाही. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून त्यांना परवानगी नाकारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता शिवाजी मैदान येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना हेलिकॉप्टरसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार ते ४.३० च्या सुमारास ठाण्यात आले. त्यानंतर त्यांनी थेट हॉटेल गाठले. तेथे फ्रेश होऊन ते सभास्थळी पोहोचणार होते. त्यानुसार, सभास्थळी इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू करण्यात आली होती. परंतु, शिवाजी मैदान हे अत्यंत छोटे असतानाही तेसुद्धा कार्यकर्त्यांनी न भरल्याने आंबेडकरांनी सभास्थळी जाणे टाळून हेलिकॉप्टरने थेट मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.आंबेडकर येणार म्हणून उन्हातान्हात १०० ते १५० कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. थोड्याच वेळाने त्यांचे आगमन होईल, असे पदाधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे आपल्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी आलेले कार्यकर्ते उन्हाची पर्वा न करता ताटकळत बसले होते. अखेर, सभा साडेसहाच्या सुमारास संपली, तरीसुद्धा ते आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते कंटाळून तेथून निघाले. आंबेडकरांची तब्येत ठीक नसल्याने ते मुंबईकडे रवाना झाल्याचे कारण यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले.
ठाण्यात सभेला गर्दी नसल्याने प्रकाश आंबेडकरांचा काढता पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 1:18 AM