- चेतन ननावरेमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुंबई आणि ठाणे परिसरात फटाक्यांच्या आतषबाजीसाठी तब्बल २५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. या संदर्भात मुंबई अँड ठाणे डिस्ट्रिक्ट फायरवर्क्स डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस मिनेश मेहता यांनी मुंबई व ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा कोणताही परिणाम फटाके विक्रीवर झाला नसल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. केवळ फटाक्यांच्या प्रकारात बदल झाल्याचे मेहता यांनी नमूद केले.मेहता म्हणाले की, राज्याच्या तुलनेत मुंबई व ठाण्यात सर्वाधिक फटाके फोडले जातात. फटाके खरेदीसाठी झालेल्या ग्राहकांच्या गर्दीमुळे शुक्रवारपासून विक्रेत्यांना क्षणाचीही उसंत मिळालेली नाही. मुळात यंदा फटाक्यांची आवकच कमी झाली होती. त्यात आवाज करणाऱ्या फटाक्यांना बगल देत, विक्रेत्यांनी रोषणाई करणाºया फटाक्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली होती. पर्यावरणप्रेमींकडून होणारी जनजागृती आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक विक्रेत्यांनी १० ते २० टक्क्यांपर्यंत कमी माल मागविला होता. त्यात ग्राहकांकडून मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे फटाक्यांची गोदामे आता ओस पडू लागली आहेत.मुंबईसह ठाण्यातून मोठ्या संख्येने फटाके खरेदीसाठी नागरिक सहकुटुंब दक्षिण मुंबईत येतात. या ठिकाणी मोहम्मद अली मार्गावर सवलतीच्या दरात मिळणारे फटाके खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. गेला आठवडाभर मोहम्मद अली मार्गावर फटाके खरेदी करणाºया ग्राहकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही होत आहे. यावरून फटाक्यांच्या खरेदी-विक्रीच्या उलाढालीचा अंदाज बांधता येतो. नागरिकांमध्ये होणाºया जनजागृतीमुळे कमी प्रदूषण करणाºया फटाक्यांना अधिक मागणी असल्याचे येथील एका विक्रेत्याने सांगितले.अनधिकृतरित्या फटाके विक्रीला उधाणपरवानाधारक विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना फटाके विक्री होते. यंदाही मुंबईतील मोहम्मद अली मार्गावर सर्रासपणे विनापरवाना फटाके विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. हाच प्रकार भायखळा, लालबाग, माझगाव, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे फटाक्यांचा आवाज येत नसला, तरी फटाके विक्रीची आतषबाजी जोमात असल्याचे दक्षिण मुंबईतील एका नामांकित फटाके विक्रेत्याने सांगितले.
मुंबई-ठाण्यात कोट्यवधींची आतषबाजी, निकालाचा कोणताही परिणाम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 6:12 AM