ठाणे : ठाण्यातील मेट्रो चारचे काम सध्या वेगाने सुरू झाले आहे. परंतु, या मुख्य मेट्रोचे नियोजन फसले आहे. नागपूरमध्ये मेट्रोचे नियोजन करताना मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी पार्किंग आणि इतर सुविधा दिल्या आहेत. परंतु ठाण्यात मात्र मेट्रोसाठी तशा सुविधाच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. तीनहात नाक्यापासून थेट घोडबंदर मार्गापर्यंत कुठेही वाहन पार्किंगची किंवा इतर व्यवस्था नसल्याने भविष्यात या ठिकाणी वाहतूककोंडीचा त्रास आणखी वाढणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
वडाळा ते कासारवडवली अशा मेट्रो चारचे काम सध्या ठाण्यात वेगाने सुरू आहे. ठाण्यातून ती तीनहात नाकामार्गे, कॅडबरी, ज्युपिटर रुग्णालय, माजिवडा, विद्यापीठ, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ करून पुढे कासारवडवली येथे जाणार आहे. परंतु, या मेट्रोच्या कारशेडचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे, तर ती २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. ठाण्यातून ती जात असताना काही ठिकाणी वृक्ष तोडले आहेत. काही ठिकाणी विद्युत पोलही हटविले आहेत, तर काही ठिकाणी भूमिगत जलवाहिन्यादेखील बदलल्या आहेत. असे अडसर दूर करून तिचे काम सुरू आहे. परंतु, तिच्या नियोजनात काहीतरी कमी असल्याचे दिसून आले आहे. नागपूरमध्ये दुचाकीसाठी वेगळे पार्किंग, चारचाकीसाठी ५० मीटरवर पार्किंगची सुविधा आहे. तसेच रिक्षासांठीदेखील येथे पार्किग आहे. मात्र, असा विचार ठाण्यातील मेट्रोमध्ये झालेला दिसून आलेला नाही.
ज्युपिटरच्या ठिकाणी एकमेव पार्किंग
मुख्य मेट्रो तीनहात नाक्यापासून पुढे जात असताना कुठेही पार्किंगची सुविधा नाही. मात्र, माजिवडा येथील जंक्शनवर ठाणे महापालिकेने उभारलेल्या पार्किंग प्लाझामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला येथील जंक्शन पुढे ठेवले होते. परंतु पालिकेने मेट्रो प्राधिकरणाच्या लक्षात ही बाब आणून देत, हे जंक्शन पार्किंग प्लाझाच्या जवळ आणावे, अशा सूचना केल्या होत्या.