- मुरलीधर भवार कल्याण : शिवाजी चौकातील सदोष रस्त्यामुळे दुचाकीवरून पडून माझी सख्खी लहान बहीण मनीषा भोईर हिचा मृत्यू झाला. तिच्यावर घराचा डोलारा होता. तिच्या मृत्यूच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. आंदोलने तसेच रस्त्यांची पाहणी झाली. मात्र, मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी एकही व्यक्ती तिच्या घरी फिरकली नाही. यावरून आपली संवेदना किती मृत झाली आहे, असा सवाल भोईर यांचा भाऊ मनोज निचिते यांनी केला आहे.मनोज हा रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मनीषाचा ७ जुलैला शिवाजी चौकात दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती तिचे पती धनाजी यांनी मनोजला दिली. ती ऐकून त्याला धक्का बसला. घटनास्थळी धाव घेत त्याने मनीषाला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.कल्याणच्या के.सी. गांधी विद्यालयात मनीषा शिपाई होत्या. त्याचबरोबर काही घरांमध्ये धुणीभांडीची कामे करत होत्या. ७ जुलैला सायंकाळी शाळा सुटली, तेव्हा पाऊस होता. त्या रस्त्याने जात असताना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना दुचाकीने घरी सोडतो, असे सांगितले. मनीषा त्याच्या गाडीवर बसल्या. १०० मीटर अंतरावर गाडी जात नाही, तोच शिवाजी चौकातील असमान रस्त्यावरून गाडी घसरून मनीषा खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून शेजारून जाणारी बस गेली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.मनोजने सांगितले की, धनाजी हे कूक असून खडकपाड्यातील हॉटेलमध्ये काम करतात. त्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही. मनीषाला तीन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी मयूरी (वय १९) ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दुसरी मुलगी माधुरी (वय १८) असून तिचे लग्न झालेले आहे. तिसरी मुलगी खुशबू (वय १६) हिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, मुलगा सागर हा वाणी विद्यालयात सातवीत शिकत आहे. मनीषा काम करून मुलांना शिकवत होती. तिच्या मृत्यूमुळे भोईर कुटुंबाचा आधार हरपला आहे.मनीषाच्या अपघातप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. आंदोलनेही झाली. अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नयेत, यासाठी आंदोलने केली जात असतील, तर चांगली बाब आहे. मात्र, मनीषाच्या घरी एकही राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी फिरकलेले नाहीत. मनीषाच्या कुटुंबाची कोणी साधी विचारपूस केली नाही. तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. शहरातील करदात्या नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत. रस्ते विकास महामंडळावर जबाबदारी ढकलली जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांत मनीषाच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे का? की केवळ ही एक दुर्दैवी घटना आहे, असे बोलून अधिकारी व सगळेच वेळ मारून नेणार आहेत, असा प्रश्न मनोजने केला आहे.मदतीसाठी ठरावाची मागणी करावीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सदस्या छाया वाघमारे यांनी मनीषा भोईरच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यावर स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी या विषयी महासभेत ठराव करण्याची सगळ्यांनी मागणी करावी, अशी सूचना केली.
मनीषाच्या कुटुंबीयांची विचारपूसही नाही, भाऊ मनोज निचिते यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 3:45 AM