लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रायते गावातील घावट आळीतून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने एखाद्याचे निधन झाल्यास त्यांची अंत्ययात्रा चक्क आठ फुटांच्या भिंतीवरून ग्रामस्थ नेत असल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, स्मशानभूमीपर्यंत रस्ता व्हावा, यासाठी या गावातील ग्रामस्थ व देशाच्या सीमेवर लढत असलेले सैन्य दलातील जवान योगेश घावट यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे.
कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कल्याणच्या ग्रामीण भागात रायते गाव आहे. या गावात घावट आळीपासून मुख्य रस्त्यापर्यंत येऊन स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. घावट आळी ते मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता व्हावा, यासाठी आठ वर्षांपासून जवान योगेश घावट, ज्ञानेश्वर घावट, शेतकरी प्रकाश व प्रेम भोईर हे स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. शेतकऱ्यांच्या राहत्या घराच्या परिसरात जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्यानेही अनेक वर्षांपासून वाईट अवस्था आहे. एकीकडे पावसामुळे शेतात चिखल असल्याने शेतातील रस्ता बंद आहे, तर दुसरीकडे घरांच्या बाजूला रस्ता अडवून इमारतीसाठी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थी, महिलांसह वयोवृद्ध यांना येजा करणे कठीण होत आहे. ग्रामस्थ शिडीने ही संरक्षक भिंती ओलांडून येजा करत आहेत. एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांची अंत्यात्रा शेतातील चिखलातून कशी न्यावी, असा प्रश्न दरवेळी ग्रामस्थांना पडतो. त्यामुळे अंत्ययात्राही संरक्षक भिंत ओलांडून न्यावी लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
- गेल्याच वर्षी जवान घावट यांच्या घरात एका सदस्याचे निधन झाले होते. तर, त्यांचे शेजारी भोईर यांच्याही घरातील एकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांची अंत्ययात्रा भिंत ओलांडून नेण्यात आली. यापेक्षा लाजिरवाणी बाब आपल्यासाठी काय असू शकते, असा सवाल जवान घावट यांनी उपस्थित केला.
-त्यामुळे आता तरी स्थानिक प्रशासन या गावाच्या रस्त्याविषयी लक्ष देणार का, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत कल्याण गटविकास अधिकारी श्वेता पालव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता तो होऊ शकला नाही.
-----------------