मीरा रोड : भार्इंदर स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांसाठी असलेला रस्ता आधीच अरुंद आहे. त्यातच तिथे फेरीवाले बसतात. तसेच तेथे वाहनतळही असल्याने प्रवाशांना त्रास होतो. त्याबाबत, अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून संताप होतो आहे.उत्तरेकडील पादचारी पुलाचा रेल्वे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर होतो. एसटी तसेच स्थानिक परिवहनच्या बसेसही येथूनच सुटतात. येथेच रिक्षा स्टॅण्ड असल्याने या पुलाचा प्रवाशांकडून अधिक वापर होतो. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांना स्थानकावर जाण्यासाठी पादचारी पुलाजवळ सुमारे १० ते १५ फूट रस्ता उपलब्ध आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा अरुंद रस्ता प्रवाशांना चालण्यासाठी अपुरा पडतो. अगोदरच या पुलाशेजारी नवीन पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना अडथळा होतो. याच पुलाजवळ दुचाकीसाठी बेकायदेशीर वाहनतळ निर्माण झाल्याने दुचाकीचालक प्रवाशांच्या गर्दीतूनच वाहनतळाकडे येजा करतात. यामुळे प्रवाशांचा त्रास वाढत असतानाही रेल्वे प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे. वास्तविक, येथे रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तरीही, तेथे बेकायदेशीरपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांना नजरेआड केले जात आहे. ऐन गर्दीवेळी तर फेरीवाले आणि दुचाकीचालक यांच्याशी प्रवाशांचा वाद होतो. यात वृद्ध, अपंग आणि महिलांना बराच त्रास सहन करावा लागतो. याबाबत, अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. रेल्वेचा एखादा वरिष्ठ अधिकारी अथवा मंत्री रेल्वे स्थानकाला भेट देणार असल्यास तेथील फेरीवाल्यांसह वाहनतळ तात्पुरते हटवले जाते. प्रशासनाच्या या स्वार्थी कारभारामुळे प्रवाशांत नाराजी आहे. (वार्ताहर)
भार्इंदरमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी रस्ताच नाही
By admin | Published: January 10, 2017 6:34 AM