लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अनुवाद करताना त्यात स्वनिर्मिती नसते, संहितेचे जणू पुनर्लेखनच असते. असे असूनही आज अनुवादित साहित्याचा प्रसार, निर्मिती जोरकसपणे होत आहे ही एक चांगली गोष्ट आहे. आजच्या वेळेस मला इ.स. १८७८ मध्ये पंडिता रमाबाई डोंगरे यांनी बायबल या अजरामर ग्रंथाचा मराठीत अनुवाद केल्याचे स्मरत आहे. हा अनुवाद करायला त्यांनी अठरा वर्षे लागली. मराठी साहित्य विश्वासाठी ही गर्वाची गोष्ट होती आणि आजही आहे. यानिमित्ताने संध्या यादव यांच्या कवितांचा अनुवाद सुजाता राऊत यांनी तितक्याच रसिकेतने आणि वेगळ्या जाणिवेने केला आहे याचे समाधान आहेच. भाषांचे आदानप्रदान होत राहणे ही आजच्या काळाची गरज आहे." कवयित्री सुजाता राऊत यांनी अनुवादित केलेल्या "स्वतःपासूनच दुरावताना" या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, अनुवादक डॉ. अनुपमा उजगरे यांनी आपल्या मनोगतात आपले विचार मांडले.
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून कवी, संपादक गीतेश शिंदे यांनी आपल्या मनोगतात मोलाचे विचार मांडले. "या अनुवादित संग्रहाला प्रस्तावना व पाठराखण करण्याच्या निमित्ताने अनुवादाची प्रक्रिया अधिक समजून घेत आली. भाषा वेगळी असली तरी भावना या चिरंतन असतात. संध्या यादव यांच्या कवितेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्या अल्पाक्षरी व सहज असून अतिशय संयतपणे त्या आपले मनोविश्व समोर आणतात. स्त्रीवादाचं त्यावर लेबल चिकटवणं योग्य नाही कारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करणारी ही कविता नाही. यावेळी मला अनुवादक, मार्गदर्शक निरंजन उजगरे यांचे स्मरण होणे अपरिहार्य."
तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहाचे दरवाजे या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने उघडले ही एक सकारात्मक बाब. कवयित्री संध्या यादव यांच्या "दूर होती नजदीकिया" या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद कवयित्री सुजाता राऊत यांनी 'स्वतःपासूनच दुरावताना'बया नावाने केला असून पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या प्रकाशन समारंभाच्या वेळी डॉ अनुपमा उजगरे, कवी, संपादक गीतेश गजानन शिंदे, कवयित्री संध्या यादव, कवयित्री सुजाता राऊत आणि कवी-लेखक-चित्रकार रामदास खरे हे उपस्थित होते. या अगोदर संध्या यादव आणि सुजाता राऊत यांनी भवतालचे विश्व, कवितेची निर्मिती, अनुवादाचा प्रवास यासंबंधीचे आपापले विचार मनोगतात मांडले. "संध्याची कविता मला एखाद्या शांत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी भासली, आजूबाजूच्या प्रदेशाला समृद्ध करणारी. माझ्या बाबांच्या विनंतीला मान देऊन संध्याचे पुस्तक मी मराठीत अनुवादित केले याचे समाधान अधिक आहे." सुजाताने आपले मत व्यक्त केले.
या संग्रहाचे मुखपृष्ठ साकारणारे कवी, चित्रकार रामदास खरे यांनी मुखपृष्ठ साकारण्यापूर्वीची आपली भूमिका आणि प्रवास उलगडून दाखवला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री तपस्या नेवे यांनी सुंदरपणे आणि नेटके केले. अंतर नियमाचे भान राखून चाळीस वाचक रसिकांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. विविध क्षेत्रातील मान्यवर योग्य खबरदारी घेऊन प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते हे महत्वाचे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी, लेखक सतीश सोळांकूरकर यांचे अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले होते. त्यामध्ये छाया कोरेगावकर, मंदाकिनी पाटील, कॅप्टन वैभव दळवी, रामदास खरे, गीतेश शिंदे, आदित्य दवणे, वृषाली विनायक, सई लेले आणि कविता मोरवणकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. या सत्राचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री प्रतिभा सराफ यांनी सुंदरपणे केले.
बऱ्याच महिन्यांनी ऑनलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमांना कंटाळलेल्या वाचक रसिकांना आणि कवी मंडळींना या कार्यक्रमामुळे मनाला काहीशी उभारी आली. या करोनाचे संकट लवकर टळो आणि अशा सकारात्मक गोष्टी घडो अशी आशा उराशी बाळगून या कार्यक्रमाची सांगता झाली.