धीरज परब मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना सुरक्षेचे उपाय मात्र आता पहिल्यासारखे गांभीर्याने घेतले जात नाहीत. एटीएम, पालिका स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटायझर दुर्मीळ असून बँकांमध्ये सॅनिटायझर अजून दिले जाते. मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व नियमित निर्जंतुकीकरण करण्यात ढिलाई आलेली आहे.मीरा-भार्इंदरमधील बँकांमध्ये ग्राहकांसाठी सॅनिटायझर अजूनही उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु, काही बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. काही नागरिक तर मास्क घालत नाहीत, वा असला तरी नाकाच्या खाली ठेवतात. पण, यासाठी बँकांचे सुरक्षारक्षक, कर्मचारीही गंभीर नसल्याचे दिसते. बँकेत गर्दी होऊ नये, म्हणून बाहेर लांब रांग लावली जाते. पण, त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. नागरिक रांगेत असताना अनेक जण थेट आत बँकेत जातात. बरेचदा त्यावरून वादही होतात.शहरात अनेक एटीएम केंदे्र असून त्यामध्ये सॅनिटायझर ठेवल्याचे दिसून आले नाही. अनेक ठिकाणी तर सुरक्षारक्षकही नसतात. त्यामुळे ग्राहकाने जर स्वत:सोबत सॅनिटायझर आणले असेल, तर त्याचा वापर करावा लागतो. बहुतांश नागरिक सुरक्षेचा विचार न करताच एटीएमचा वापर करतात. शहरात महापालिकेची सुमारे २२५ स्वच्छतागृहे आहेत. यातील काही स्वच्छतागृहे ही खाजगी संस्थांनी बांधून तेच पैसे आकारून चालवत आहेत. सुमारे १८० स्वच्छतागृहे पालिकेने साफसफाईकामी खाजगी ठेकेदारांना दिली आहेत.कोरोनाच्या संसर्गाचा सर्वात धोका आधीपासूनच अस्वच्छ असणाऱ्या या स्वच्छतागृहांमध्ये आहे. परंतु पालिका, नगरसेवक आणि ठेकेदार मात्र केवळ ठेके देण्यातघेण्यात इच्छुक असल्याने येथील स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. पुरेसे पाणी नाही, अस्वच्छता, साफसफाई काटेकोर नाही, तसेच हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर तर सोडाच, साधा साबणही ठेवला जात नाही.>महापालिकेने झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर भर दिला असून मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांचे नियंत्रण त्यावर आहे. झोपडपट्टी भागातून कोरोना वा अन्य साथरोग पसरू नये, यासाठी स्वच्छतागृहे नियमित स्वच्छ ठेवली जात आहेत. - डॉ . संभाजी पानपट्टे, उपायुक्त
सुरक्षेच्या उपायांबाबत गांभीर्य नाही, नागरिकांकडूनही नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 2:02 AM