ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील दोन निवडणुकांत बंडखोरी फारशी झाली नसली, तरी काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु, २००९ मध्ये विजयी मार्जिनच्या थोड्या जवळची मते या अपक्षांना मिळाली होती. तर, २०१४ च्या निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक झाल्याने अपक्ष हे विजयी मार्जिनच्या कौसो दूर दिसून आले.प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षात बंडखोरी आढळून येतेच. काही ठिकाणी नाराजी थेट व्यक्त होत नसली, तरी त्यांच्या कामातून किंवा पूर्ण ताकदीनिशी काम न करण्याच्या कृतीतून हे नेते आपली नाराजी दाखवून देतात. अशा बंडखोरी आणि नाराजीचा मग लोकसभेच्या प्रमुख उमेदवाराला फटका बसू शकतो. परंतु, ठाणे लोकसभेत मात्र २००९ किंवा २०१४ च्या निवडणुकीत तसा काहीच परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात उतरले होते. तर, विजयी झालेल्या उमेदवाराला तीन लाख एक हजार मते मिळाली होती. तर, पराभूत झालेल्या उमेदवाराला दोन लाख ५१ हजार ९८० मते मिळाली होती. यावेळी विजयाचे मार्जिन हे ४९ हजार २० एवढ्या मतांचे होते. यावेळी २२ अपक्षांना ३२ हजार ९१ मते मिळाली होती. तर, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी मोदीलाट असल्याने या लाटेत प्रमुख पक्षांसह अपक्ष कुठेच टिकाव धरू शकले नाही. यावेळी विजयी उमेदवाराला पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती. पराभूत उमेदवाराला तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. तर, विजयी मार्जिन हे दोन लाख ८१ हजार २९९ एवढे होते. अपक्षांना केवळ २० हजार ८९५ मते मिळाली होती.
प्रमुख पक्षांसमोर अपक्ष उमेदवारांचा टिकाव नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 1:11 AM