लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : कोरोनावरील उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील एक हजार ६०३ अंगणवाड्या अद्याप बंदच आहे. या अंगणवाड्यांच्या सोयी-सुविधेच्या दृष्टीने विचार करता येथील बालकांसाठी पिण्याच्या पाण्याची तात्पूर्ती व्यवस्था केलेली आहे. मात्र, यापैकी तब्बल एक हजार ३०७ अंगणवाड्या नळपाणी पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आधीच त्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील गावपाड्यांमध्ये एक हजार ६०३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यापैकी २९८ अंगणवाड्यांना नळपाणीपुरवठा केलेला आहे. उर्वरित ५४८ अंगणवाड्यांच्या नळजोडणीचे काम प्रगतीवर असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने केला आहे. या अर्धवट अंगणवाड्यांसह ६४९ अंगणवाडीकेंद्रांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू नाही. यांच्या या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे सुतोवाच या महिला व बालविकास विभागाने केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग झटत आहे. त्यास अनुसरून शाळा आणि अंगणवाड्या बंद आहेत. अंगणवाडीकेंद्रांचा विचार करता ३०० अंगणवाड्यांना नळजोडणी असून, तब्बल एक हजार ३००पेक्षा अधिक अंगणवाड्यात अद्यापही नळाचे पाणी नाही.