- जितेंद्र कालेकर, ठाणेपाणी आणि स्वच्छतागृह या मुलभूत सुविधाही वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नाहीत. याशिवाय, पुरेशा मनुष्यबळाच्याअभावी मोठी कसरत करावी लागते..एकेकाळी आशियातील सर्वात मोठी असलेल्या वागळे इस्टेट इंडस्ट्रीयल इस्टेट विभागात एमआयडीसीनेच या पोलीस ठाण्याला जागा दिली. तेंव्हा १९७९ मध्ये त्याची स्थापना झाली. गेल्या ३६ वर्षांपासून जुनी असलेली या पोलीस ठाण्याची वास्तू आता धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, मदन पाटील (गुन्हे), सुलभा पाटील आणि दिलीप साळुंखे या चार निरीक्षकांसह ३ एपीआय, ८ उपनिरीक्षक, १२२ कर्मचाऱ्यांना मंजूरी आहे. त्यापैकी निरीक्षक वगळता ६ उपनिरीक्षक आणि ३० ते ४० कर्मचाऱ्यांची याठिकाणी गरज आहे. संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, हाजूरी आणि मॉडेला चेक नाका या चार बीटमध्ये ठाणे महापालिकेचे रायलादेवी प्रभाग समिती, कामगार रुग्णालय, पासपोर्ट, कामगार न्यायालय, प्रादेशिक परिवहन विभाग ही महत्वाची कार्यालये तसेच इटर्निटी मॉल, ४ महाविद्यालय, ४० ज्वेलर्सची दुकाने, १० बँका आदींसह आठ लाख लोकसंख्येची वस्ती या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येते. चोरी, घरफोडी, फसवणूक, विनयभंग आणि फसवणूकीच्या गुन्हयांचे नेहमीच आव्हान आहे. त्यामुळे गुन्हेगारीसह इतक्या मोठया परिसराची कायदा सुव्यवस्था हाताळतांना तहान भूक विसरावी लागतेच पण, ३६५ दिवस निर्जळीही करावी लागते. एकेकाळी, सुरक्षितता म्हणून कुख्यात डॉन अरुण गवळीलाही इथल्या कोठडीत ठेवले होते. आता मात्र तीन कोठड्यांपैकी एकीची दुरवस्था असून उर्वरित एक पुरुष तर दुसरी महिला आरोपींसाठी आहे. तिथेही कोपरी, वर्तकनगर आणि श्रीनगरच्या महिला आरोपींना ठेवले जाते. त्यामुळे ती अपुरी पडते. दोन पैकी एक जीप नादुरुस्त तर गस्तीची मोठी व्हॅनही गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीला गेलेली आहे. अशा परिस्थितीत पोलीसांकडून कार्यक्षमतेची काय अपेक्षा करणार? एका निरीक्षकाला तर कॅबिन नाही. स्वच्छतागृह नावालाच आहे. मुद्देमाल, हत्यार रुमचीही दुरवस्था आहे. प्रशस्त जागा असूनही धोकादायक आणि अपुऱ्या जागेतूनच पोलीसांना काम करावे लागत आहे. त्यामुळे किमान लोकसंख्येच्या निकषानुसार जादा संख्याबळ आणि प्रशस्त नवी इमारत मिळावी, अशी माफक अपेक्षा येथील कर्मचाऱ्यांची आहे. सरकार कडे पैसे नसतील तर युती सरकारच्या काळात परिवन मंत्री प्रमोद नवलकर यांनी जशी प्रायोजकांच्या माध्यमातून मलबार हिल आणि चर्नीरोड येथे सुसज्ज पोलीस ठाणे बांधलीत त्याचे अनुकरण ठाण्यात व्हावे अशी वर्दीची अपेक्षा आहे.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाणीच नाही
By admin | Published: July 30, 2015 11:22 PM