लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात अनेक ठिकाणी अनलॉक झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यानुसार, आता एसटीची सेवादेखील हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. एसटीच्या ५० टक्के बस रस्त्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे. यात ठाण्यातून रातराणीची सेवादेखील सुरू झाली आहे. परंतु, त्यादेखील ५० टक्केच रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही. दुसरीकडे खाजगी बसेसना मात्र प्रवासी अधिक पसंती देताना दिसत आहेत. एसटीच्या तुलनेत खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसचे दर अधिक असतानाही त्यांना पसंती दिली जात आहे.
कोरोनाची लाट येण्यापूर्वी ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या दिवसाला ५५० गाड्यांची या आगारातून राज्यभर वर्दळ सुरू असायची. दिवसाला या गाड्या अंदाजे एक लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. तर, त्यावेळेस एसटीचे उत्पन्न ६० ते ६२ लाखांचे होते. परंतु, पहिल्या लॉकडाऊनला प्रवासी संख्या घटण्यास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे दुस-या लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा एसटी विभागावर जणू कु-हाडच कोसळली आहे. पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे या लॉकडाऊनमध्ये लांबच्या पल्ल्यांवर एसटी धावणे बंद झाले असून फक्त अत्यावश्यक मार्गांवरच एसटी धावत होत्या. या गाड्या प्रामुख्याने ठाणे, मुंबई, पनवेल, वाडा आदी मार्गांवर धावत होत्या. त्यामुळे साधारण दिवसाला ४१ हजार किलोमीटरचा प्रवास होत आहे. परंतु, आता अनलॉकनंतर एसटीचे पुन्हा सध्या ५० टक्के ऑपरेशन सुरू झाले आहे. एसटीच्या ताफ्यात ठाण्यात ४५० बस असल्या, तरी त्यातील १३० बस या महाराष्ट्र राज्यातील असून इतर राज्यांच्या ४ आणि ठाणे अंतर्गत ३१६ बस या विविध मार्गांवर धावत आहेत. इतर राज्यांमध्ये भिवंडी ते विजापूर, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते गाणगापूर आणि ठाणे ते हैदराबाद यांचा समावेश आहे. अनलॉकनंतरही लांब पल्ल्यांच्या मार्गांना ब्रेक लावला होता. त्यात आता ३१६ पैकी १६० च्या आसपास बस रस्त्यावर धावत असून त्यांच्या ८५० च्या आसपास फे-या होत आहेत.
एसटीच्या किती फे-या सुरू आहेत
८५०
रातराणी
३५
चालक आणि वाहक - ३४००
सध्या ५० टक्के प्रतिसाद
एसटीच्या माध्यमातून सध्या जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, साखरपा, चिपळूण, वडुज, दहिवडी, महाड, शिवथरे, अहमदनगर आदींसह इतर अशा १५ मार्गांवर रातराणी फे-या आहेत. परंतु, यातील जवळजवळ सर्वच मार्गांवर फारसा प्रतिसाद दिसत नाही. प्रवासी अद्यापही काही प्रमाणात प्रवास करताना भीत असल्याने या मार्गांवरील रातराणी बसला ५० टक्के प्रतिसाद मिळत आहे.
ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, प्रतिसाद ५० टक्केच
एसटीप्रमाणे ट्रॅव्हल्सचीदेखील अशीच काहीशी अवस्था आहे. अनलॉकनंतर खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस रस्त्यावर उतरत असल्या तरी रातराणीलादेखील ५० टक्केच प्रतिसाद सध्या मिळत असल्याची माहिती ट्रॅव्हल्सवाल्यांनी दिली. त्यातही एसटीचे एखाद्या मार्गाचे तिकीट ३०० रुपये असेल, तर त्याच मार्गासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले ५५० रुपये आकारत आहेत. परंतु, बसमध्ये बसण्यासाठी येणा-या प्रवाशाला सॅनिटाइझ करूनच सोडले जात असल्याने तसेच बसही सॅनिटाइझ केली जात असल्याने खाजगी बसला प्रवाशांची पसंती मिळत आहे.
......
येत्या काही दिवसांत रातराणीला आणखी प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या ५० टक्के प्रतिसाद मिळत आहे. कोकणात रुग्ण वाढत असल्याने त्याठिकाणी जाणा-या रातराणी बसचे प्रमाण कमी केले आहे. परंतु, इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने सेवा सुरू केली जात आहे.
(विनोदकुमार भालेराव - विभागीय नियंत्रक, एसटी, ठाणे)