ठाणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येची सुसाइड नोट पाठवून जवळपास दहा दिवस झाले. मात्र, अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. या प्रकरणाचा एकंदरीत तपास सुसाइड नोटच्या अहवालावर अवलंबून आहे. ही नोट परराज्यात तपासासाठी पाठवल्याने पोलीस अजूनही प्रतीक्षेतच आहेत. पोलिसांनी हा अहवाल ताब्यात घेण्यासाठी एका अधिकाऱ्याचीही निवड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.परमार यांनी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी गुजरात येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवली. पोलिसांनी परमार यांच्या हस्ताक्षरांची ओळख पटवण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या काही डायऱ्या ताब्यात घेऊन त्याही लॅबकडे पाठवून दिल्या आहेत. या अहवालानंतर नोटमधील खाडाखोड केलेली माहिती आणि ती नोट त्यांनीच लिहिलेली आहे का, याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे हा अहवाल लवकर सादर करण्याची मागणी पोलिसांनी संबंधित लॅबतज्ज्ञाकडे केली आहे. त्यामुळे याबाबत अहवाल कधी येईल, हे सांगता येत नसल्याने, पोलिसांनी तो अहवाल ताब्यात घेण्यासाठी एका अधिकाऱ्याची निवड केली आहे. (प्रतिनिधी)
सुसाइड नोटचा अहवाल अद्याप नाही
By admin | Published: October 19, 2015 2:29 AM