लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील जलराणी बोटीवर दोन खलाशी नव्याने आले होते. त्यामुळे मासेमारी साठी जाताना सोबत त्यांच्या आधारकार्डच्या छायांकित प्रति नसल्याने गोंधळ उडाला असल्याचे समोर आले आहे. पण यात मासेमारी न करताच माघारी फिरावे लागल्याने नाखवाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मासेमारी साठी जाताना बोटीच्या परवान्यासह नाखवा, खलाशी यांचे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड च्या छायांकित प्रति मच्छीमार सोबत नेत असतात. मात्र उत्तनची जलराणी बोट मासेमारी साठी समुद्रात गेली असता नाखवा बेन्हार जॉनी बुटी व त्यांचा मुलगा सोनीसोन तसेच अन्य १३ खलाशी मिळून १५ जण बोटीवर होते. त्यातील दोन खलाशी आयत्यावेळी बदली वर आल्याने त्यांची आधारकार्ड ची प्रत सोबत नेण्यास नाखवा विसरले.
समुद्रातील तेल विहरीच्या जवळ शनिवारी सकाळी मासेमारी जाळी टाकून ते थांबले असता ८.३० च्या सुमारास नौदलाच्या बोटीने त्यांना हटकले. दोन खलाशीची ओळखपत्रे नसल्याने बोट थांबवण्यास सांगितले. नंतर तटरक्षक दलाची बोट आली असता त्यांनी तपासणी सुरू केली. जेव्हा उत्तन सागरी पोलिसां मार्फत त्या दोन खलाशिंची ओळख पटल्यावर सायंकाळी ४ वाजता बोट सोडण्यात आल्याची माहिती सोनीसोन यांनी दिली.
त्यातच बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची अफवा पसरून तणाव व गोंधळ निर्माण झाला. शनिवारी रात्री बोट किनारी आल्यावर पोलिसांनी चौकशी करून जबजबाब नोंदवले.
या घटने मुळे मानसिक त्रास तर झालाच पण मासेमारी न करताच परतावे लागल्याने आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे. खलाशी यांचा पगार द्यावा लागलाच शिवाय डिझेल, बर्फ, किराणा आदी वाया गेल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याचे सोनीसोन म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"