लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गुरुवारी वटपौर्णिमा असल्याने बुधवारी दुपारपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. ग्राहक आणि विक्रेते मास्कविना फिरताना दिसत होते तर गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत महिलांची लगबग दिसत होती. फणस, वडाच्या फांद्या, पाने, जांभूळ, करवंद, छोटे आंबे, पाच फळे, फुले तसेच इतर पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस प्रयत्न करीत होते. ज्या विक्रेत्यांनी मास्क घातले नव्हते त्या विक्रेत्यांना सुज्ञ ठाणेकर मास्क घालण्यास सांगत होते. गर्दीमुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले. महिला बाहेर जाऊन वडाची पूजा करतात. यंदा मात्र घरीच फांदी आणून पूजा करणार असल्याचे अनेक महिलांनी सांगितले.