ठाणे : सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकवण्यासाठी सहकारी महिला सुरक्षारक्षकाकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग करणाऱ्या रणवीरसिंग सणमेदा (५४, रा. आनंदनगर) या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वीही महिलेला शिवीगाळ केल्याची तक्रार चितळसर पोलिसांत दाखल झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
टिकुजिनीवाडी या रिसॉर्टमध्ये २५ जुलै २०१९ रोजी सायंकाळी रणवीरसिंग याने तिथल्याच एका सुरक्षारक्षक महिलेशी गैरवर्तन केले होते. त्याने तिला स्वच्छतागृहाकडे बोलवले होते. येथील सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असून तुला नोकरी टिकवायची असेल, तर आपल्याशी शरीरसंबंध ठेव, अशी गळ त्याने घातली. तिने त्याला स्पष्ट नकार देताच त्याने तिच्याशी लगट करून विनयभंग केला. याप्रकरणी सुरक्षारक्षक एजन्सीचे कार्यकारी अधिकारी सुयोग्य बारावकर यांच्या मदतीने तिने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या पथकाने त्याला अटक केली. रणवीरसिंगने दोन महिन्यांपूर्वीही एका महिलेशी गैरवर्तन केले होते. याप्रकरणी त्यावेळी चितळसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला होता. त्याचवेळी व्यवस्थापनाने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली असती, तर २५ जुलैचा प्रकार घडला नसता, असेही तक्रारदार सुरक्षारक्षक महिलेने म्हटले आहे.