अंबरनाथ - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. काही ठिकाणी नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर, तर काही ठिकाणी कोकण म्हाडा महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर्स काढण्यासाठी आचारसंहिता पथक पोहोचलेलेच नाही. त्यामुळे आचारसंहिता पथक नेमके करतेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आचारसंहिता लागू झाल्यावर बदलापूर शहरातील बॅनर काढण्यात आले आहेत; मात्र ग्रामीण भागात पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता लागून आठवडा उलटलेला असतानाही ग्रामीण भागात पुढाऱ्यांचे बॅनर्स झळकत आहेत. ग्रामीण भागातील होर्डींगवर आचारसंहिता पथकाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. बदलापूर खरवई गाव सोडल्यावर चामटोलीपासून ग्रामीण भागाला सुरुवात होते. चामटोली ते वांगणी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे बॅनर झळकत आहेत. बदलापूर-कर्जत रस्त्यावर खाजगी जागेत मोठमोठे होर्डींग उभे करण्यात आले आहेत. त्यावरही कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच या भागात कोणताही पुढारी, वाटेल त्या ठिकाणी बॅनरबाजी करीत आहे. निवडणूक काळातही हीच परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुखांचा वाढदिवस होऊन १० दिवस उलटले असतानाही त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर अजुनही दिसत आहेत. गोरेगांव-वांगणी या भागात गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठीदेखील बॅनर लावण्यात आले आहेत.आचारसंहिता काळात बॅनर लावताना त्याची परवानगी घेणे आणि परवानगीचा क्रमांक बॅनरवर टाकणे बंधनकारक आहे; मात्र एकाही बॅनरची परवानगी घेतलेली दिसत नाही.आचारसंहितेच्या काळात राजकीय पुढाऱ्यांचा हा अतिउत्साहीपणा रोखण्याचे काम आचारसंहिता पथकाच्या प्रमुखाने करणे गरजेचे आहे; मात्र आचारसंहिता प्रमुख ग्रामीण भागात जातच नसल्याचे दिसत आहे.कार्यालयात बसून कामकाज सुरु असल्याने शहराबाहेर नेमके काय सुरु आहे, याची कल्पना कोणालाच नाही. आचारसंहिता काळात पक्षाचे झेंडे काढणे गरजेचे आहे; मात्र तेदेखील तसेच ठेवण्यात आले आहेत.महामार्गावर ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कल्पना न केलेलीच बरी. ग्रामीण भागात मिळेल तिथे बॅनर लावले जात असून, आचारसंहितेला कुणीच जुमानत नसल्याचे दिसत आहे.
बदलापुरात आचारसंहितेचे तीन तेरा, राजकीय बॅनर्स जैसे थे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 2:53 AM