उल्हासनगर : महापालिकेच्या भूखंड क्रमांक २४५ वरील कबरस्तानाचे आरक्षण रद्द करून ३०० कुटुंबाना बेघर होण्यापासून वाचवा, असे साकडे नागरिकांच्या शिष्टमंडळासह आमदार बालाजी किणीकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे.शहरातील नं-५, हिंदू स्मशानभूमीजवळील भूखंड सुधारित विकास आराखडयात कबरस्तानासाठी राखीव दाखवले आहेत. पालिकेने खुले व आरक्षित भूखंडाऐवजी सिध्दार्थनगर येथील भूखंड कबरस्तानासाठी देण्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करून, तीन महिण्याच्या आत कबरस्तान हस्तांतरीत करण्याचे संकेत दिले. येथील भूखंडावर ३०० पेक्षा अधिक कुटुंब कित्येक वर्षापासून राहत असून त्यांना घरे रिकामी करण्यासाठी नोटीस पालिकेने बजावल्या आहेत. याप्रकाराने स्थानिक नागरिक हैराण झाले असून बेघर होण्याच्या भीतीने राजकीय नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याकडे स्थानिकांनी साकडे घातल्यावर त्यांनी वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार बालाजी किणीकर यांनी मागील आठवडयात सिध्दार्थनगर येथील रहिवाशांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. खुल्या व आरक्षित भूखंडाऐवजी निवासी जागेवर कबरस्तान कसे? असा प्रश्न पालिका आयुक्तांना केला. श्रीमंतांना वाचविण्यासाठी पालिकेचा खेळ असल्याचा आरोप किणीकर यांनी केला. रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालकमंत्र्यांची भेट घेतली. ३०० कुटुंबांना बेघर करू नका, अशी मागणी करण्यात आली.म्हारळ येथे जागा द्यासिध्दार्थनगर येथील कबरस्तानालाही मुस्लिम समाजाचा विरोध आहे. येथील ३०० कुटुंबांपैकी अर्धेअधिक मुस्लिम समाजाचेही बेघर होणार आहेत. म्हारळ गाव येथील गृहसंकुला शेजारील भूखंड कबरस्तानासाठी निश्चित करा. यापूर्वी येथे दोन दफनविधी झाले असून खुल्या जागेमुळे स्थानिक नागरिकांचा विरोध हळूहळू कमी होण्याची शक्यताही मुस्लिम समाज व्यक्त करत आहेत.
उल्हासनगरमध्ये ३०० कुटुंबांवर येणार बेघर होण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:56 PM