उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी स्वच्छता मार्शल नियुक्त करण्याचा ठराव २० ऑगस्टच्या महासभेत येणार आहे. रस्त्यावर कचरा टाकने, थुंकणे, उघड्यावर लघुशंका, शौचास बसणे आदीवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वच्छता मार्शल नेमण्यात येणार असून दंडात्मक कारवाईचे दरपत्रक महासभेत प्रस्तावित केले आहे.
उल्हासनगरातील स्वच्छतेबाबत नेहमी टीका टिपण्णी होत असते. मात्र काही वर्षांपासून शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाई अभियान यशस्वीपणे राबविले जात असल्याने, शहराचा बकालपणा काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र शासनाच्या स्वच्छता अभियानात महापालिकेत स्वच्छतेचा दर्जा समाधानकारक नाही, असे महासभेत आणलेल्या प्रस्तावात नमूद केले. यातूनच शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी स्वच्छता मार्शल नेमण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला. मात्र कोरोना महामारीत सादर प्रस्ताव महासभेत आणण्याला उशीर झाल्याचे बोलले जाते. सुरुवातीला २० स्वच्छता मार्शल नेमण्याचा घाट असून त्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देण्यात आले. स्वच्छता मार्शल महापालिका आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी यांच्या अधिकाराखाली काम करून दंडात्मक कारवाई करणार आहेत.
शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रस्तावात दंडात्मक कारवाईचे दर प्रस्तावित केले आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यास १५० रुपये, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे याला १०० रुपये, उघड्यावर शौचास बसणे ५०० रुपये, प्लास्टिक व थर्मोकोल ठेवणाऱ्यावर पहिली वेळ ५ हजार दुसरी वेळ १० हजार तर तिसऱ्या वेळी २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यावर प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी ५००, रस्त्यावर गाड्या धुणे एक हजार, इमारतीचा मलनिस्सारण पाईपला गळती साठी १० हजार, दुकानदार व फेरीवाले यांनी कचऱ्याचा डबा न ठेवल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाईचे दर प्रस्तावित केले. याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वच्छता मार्शलमुळे नागरिकांना शिस्त लागेल
कोरोना महामारी नागरिकांना स्वच्छता शिकवून जात आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेला स्वच्छता मार्शल नेमावे लागणे दुर्दैवी असून, शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महासभेत आलेला प्रस्ताव एकमताने मंजूर करावा. यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी दिली.