प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजर करण्या येणाऱ्या 'वाचन प्रेरणा दिनानिमित्त' ठाणे महापालिका शाळांमध्ये 'चला वाचूया' हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महापालिकेच्या सर्व शाळांमधील पाचवी ते दहावी या इयत्तांमधील प्रत्येक वर्गात पुस्तक कोपरा निर्माण केला जाणार आहे. प्रत्येक वर्गाची पट संख्या लक्षात घेवून, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण झाली तर, वर्षभरात प्रत्येक विद्यार्थ्याची ही सर्व पुस्तके वाचून होतील. नवीन वर्षात, नवीन इयत्तेत नवीन पुस्तकांचा संच उपलब्ध होईल, अशी या उपक्रमामागची संकल्पना असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
'चला वाचूया' या उपक्रमाचा आरंभ किसन नगर येथील महापालिका शाळा क्रमांक २३ मध्ये बुधवार , १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वर्षभरात सर्व महापालिका शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक वर्गात ३० पुस्तके असतील. पुस्तकांची निवड विद्यार्थ्यांच्या वयानुरूप आणि अपेक्षित विषयानुरूप केली जाईल. 'लेट्स रीड फाऊंडेशन'च्या सहकार्याने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. शाळांमध्ये ग्रंथालये आहेत. मात्र दुर्दैवाने सर्व विद्यार्थी या ग्रंथालयात नियमित जाता नाहीत. किंवा ती सुविधा सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे, वर्गातच पुस्तक कपाट उपलब्ध झाल्याने कोणत्याही परवानगीची वाट न बघता विद्यार्थ्यांना पुस्तके सहज हाताळता येतील. कायम उपलब्ध राहतील. हे साध्य करणे या उपक्रमाच्या माध्यमातून शक्य होणार आहे, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाचनाच्या नोंदी ठेवण्यासाठी एक पासबूक दिले जाणार आहे. त्याला जाणीवपूर्वक 'पासबूक' असे नाव देण्यात आले आहे.
ज्या पद्धतीने बँकेच्या पासबूकमध्ये खात्यात जमा असलेल्या धन राशीची नोंद केली जाते. त्याच पद्धतीने या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ज्ञानाचे जे संचित विद्यार्थ्यांना मिळेल त्याची नोंद पासबुकमध्ये त्यांनी स्वतः करायची आहे. वाचलेल्या पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहिणे अपेक्षित आहे. या अभिप्रायाला शब्द मर्यादा नाही. अगदी पुस्तक मला आवडले इथपासून त्या पुस्तकाबद्दल त्याला जे वाटते ते त्याने पुस्तकात लिहावे. वाचनाच्या माध्यमातून या पासबूक मध्ये फक्त जमा (क्रेडिट) नोंदी असतील. वजा (डेबिट) नोंद होणार नाही, ही यातील लक्षणीय गोष्ट असल्याचे आयुक्त म्हणाले.