ठाणे : ठाण्यासह मुंबईतील उपनगरांमध्ये दिवसाढवळ्या चो-या करणा-या चौकडीपैकी लोकनाथ आरमुरगम शेट्टी (२२) आणि राजेश शेट्टी (४२) या अट्टल चोरट्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे नऊ लाखांचे ३० तोळे सोने हस्तगत केले आहे.खबरी आणि काही तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने २९ डिसेंबर २०१७ रोजी लोकनाथ आणि राजेश या दोघांना मुंबईच्या विलेपार्ले भागातून अटक केली. बंद घरांचे सर्वेक्षण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच दिवसाढवळ्या लोकनाथ आणि त्याचे अन्य तीन साथीदार हे चोºया करून पसार होत होते. ठाण्याच्या नौपाड्यातील एक, विलेपार्ले, सांताक्रूझ, बोरिवली आणि कांदिवली तसेच ठाण्याच्या श्रीनगर भागात १८ डिसेंबर रोजी ‘शुभलक्ष्मी’ या इमारतीमधील मोहन पाटील यांच्या घरातून ४५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी आणि ७० हजारांची रोकड अशा १२ लाख १३ हजारांच्या ऐवजाची चोरी त्यांनी केली होती. त्याच इमारतीमधील मोहनलाल जैन यांच्या घरातूनही २८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह साडेसात लाखांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली.गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू-पोलीस कोठडीची मुदत ६ जानेवारीला संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे मोहन शेट्टी आणि रोहित शेवाळे हे अन्य दोन साथीदार मात्र अजूनही पसार आहेत. ते परराज्यांत गेल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाण्यातील श्रीनगर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘ते’ अट्टल चोरटे ठाणे कारागृहात, ९ लाखांचे ३० तोळे सोने हस्तगत : अन्य दोघांचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:17 AM