- नितीन पंडित भिवंडी : भिवंडीतील गायकवाड परिवारावर कोरोनाने मोठा घाला घातला आहे. घरातील कर्ता तरुण व वयस्कर वडील या दोघांचाही अवघ्या आठ दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. सध्या या परिवारात एकमेव कर्ता पुरुष असून तो कोरोनाच्या मगरमिठीतून सुटून आपल्या परिवाराचा मोठ्या धैर्याने सांभाळ करीत आहे.
प्रथमेश नामदेव गायकवाड (२९) व वडील नामदेव गोविंद गायकवाड (६२) या दोन्ही कर्त्या पुरुषांवर कोरोनाने घाला घातला. प्रथमेश यांची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसूतीची वेळ जवळ आल्याने रुग्णालयाच्या फेऱ्या मारताना कोरोनाची लागण झाली होती. १३ जूनला सिझेरियन झाल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने परिवाराला एकच धसका बसला. त्यातच प्रथमेशला या अहवालाचा मोठा धसका बसल्याने तो मानसिक तणावातच होता.
पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्रथमेश व त्याच्या कुटुंबीयांनी तिला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सुदैवाने नवजात अपत्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, त्यालाही उपचारासाठी ठाण्यातच एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पत्नी व मुलाला वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केल्याने प्रथमेश व त्यांच्या परिवाराची मोठी धावपळ झाली.
याचदरम्यान प्रथमेशला कोरोनाची लागण झाली. पत्नीच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या दगदगीमुळे प्रथमेशची प्रकृती खालावली असल्याने त्याला शहरातील कोविड रुग्णालयात दाखल केले. मात्र, पत्नीच्या प्रसूतीनंतर अवघ्या चार दिवसांतच म्हणजे १६ जून रोजी प्रथमेशचा मृत्यू झाला. नवजात बाळाला डोळे भरून न पाहता त्याने कोरोनाशी झुंज देत असलेल्या पत्नीची साथ सोडली.
प्रथमेशच्या निधनाने गायकवाड परिवार आणखी तणावात सापडला. प्रथमेशच्या वडिलांची प्रकृतीही बिघडली. त्यांचीही तपासणी केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला व प्रथमेशच्या मृत्यनंतर अवघ्या चार दिवसांतच प्रथमेशचे वडील नामदेव गायकवाड यांचाही २० जून रोजी मृत्यू झाला.
प्रथमेश हा भिवंडी महापालिकेचा कर्मचारी होता, तर त्याचे वडील मनपाचे निवृत्त कर्मचारी होते. दरम्यान, शासन व महापालिकेची कोणतीही मदत या परिवाराला आतापर्यंत तरी मिळाली नाही. फक्त एका नगरसेवकाचा सांत्वनासाठी फोन आला, मात्र त्यानंतर मनपा अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींना या परिवाराचा पुरता विसर पडला आहे.
आठ दिवसांत आयुष्य झाले उद्ध्वस्त
प्रथमेशचा मोठा भाऊ निलेश हाच या परिवाराचा सांभाळ करीत आहे. निलेश शाळेत काम करतो. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. याच दरम्यान निलेशलाही कोरोना झाला, मात्र, सुदैवाने निलेशने कोरोनावर मात केली. आता प्रथमेशची पत्नीही कोरोनातून बरी झाली आहे. कोरोनाने अवघ्या आठ दिवसांत आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले. काही जण अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असे निलेश गायकवाड याने सांगितले.