ठाणे : पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अटकेतील त्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गळ्यास दुसऱ्या चौकशीचा फास लवकरच ओढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही चौकशी त्यांनी शासकीय नोकरी करताना त्यांना मिळणाऱ्या पगारातून सापडलेली संपत्ती खरेदी करता येऊ शकते का? याची असणार आहे.सिंचनातील गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू झाल्यावर ठाणे लाचलुचपत विभागाने पहिली तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. त्या वेळी ६ शासकीय अधिकाऱ्यांसह कंत्राटदार अशा ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर लाचलुचपत विभागामार्फत त्या ६ जणांसह कंत्राटदाराच्या घराची झडती घेतली. त्या वेळी तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, तत्कालीन सहायक अभियंता राजेश रिठे आणि तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनी, फ्लॅट, सोन्याचे दागिने, वाहने अशी मालमत्ता निदर्शनास आली. यानुसार, ती संपत्ती सील करून त्यांना मिळणाऱ्या पगारातून ती संपत्ती खरेदी करता येऊ शकते का? याची वेगळी तपासणी लवकरच सुरू होणार आहे. त्यानुसार त्यांच्यावर लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
‘ते’ शासकीय अधिकारी आणखी अडचणीत
By admin | Published: August 31, 2015 1:31 AM