ठाणे : नऊ मीटरपेक्षा कमी रुंद असलेल्या रस्त्यांमुळे जुन्या ठाण्याचा रखडलेला विकास आता मार्गी लागणार आहे. नगरविकास विभागाने याला हिरवा कंदील दिल्याने आता २१ नाही, तर ३४ रस्त्यांचा नऊ मीटरचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने विधानसभा निवडणुकीपूर्वी या ३४ रस्त्यांची यादी तयार केली होती. त्यानुसार, आता लवकरच हे रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानुसार, येथील धोकादायक, मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार आहे.
कोपरी ते माजिवडादरम्यान असलेल्या २१ रस्त्यांची रुंदी नऊ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला होता. त्यात कालांतराने आणखी १२ रस्त्यांची भर पडली असून एकूण ३४ रस्त्यांचे रुंदीकरण होणार असल्याने जुन्या ठाण्यात यामुळे पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.
जुन्या ठाण्यातील कोपरी ते माजिवडा पट्ट्यातील रोड हे ग्रामपंचायतकाळात बांधले आहेत. या रस्त्यांची रुंदी केवळ सहा ते आठ मीटरपर्यंत असल्याने आताच्या लोकसंख्येनुसार आणि वाहनांची संख्या लक्षात घेतल्यावर हे रस्ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे या पट्ट्यात असणाऱ्या ३० वर्षे जुन्या इमारतींना टीडीआर मिळत नसल्याने हा पुनर्विकास रखडला आहे. एमआरटीपी कायद्यानुसार इमारतीचा विकास करताना फायर ब्रिगेडचे वाहन किंवा आपत्ती विभागाचे वाहन आतमध्ये येण्यासाठी नऊ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंद रस्ता असणे आवश्यक आहे. वागळे किंवा लोकमान्यनगरसारख्या परिसरासाठी क्लस्टर योजना आखली असली, तरी जुन्या ठाण्यासाठी मात्र अद्याप या मुख्य कारणांमुळे क्लस्टर योजनेचे नियोजन केलेले नाही. महापालिकेने या सर्व रस्त्यांचा सर्व्हे केला होता. यामध्ये या सर्व २१ रस्त्यांची रुंदी नऊ मीटरपेक्षा कमी असल्याने कोंडीचा मोठा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेषत: नौपाडा व राबोडी परिसरांत अरुंद रस्त्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले होते.
रामवाडी (विष्णुनगर) सारस्वत बँक ते वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग, हिंदू कॉलनी - ए - अनमोल हाइट्स ते यज्ञेश्वर सोसायटी, हिंदू कॉलनी -बी - पंपिंग स्टेशन रोड, बी केबिन रोड, रेल्वे कॉलनी रोड, शेलारपाडा (कोलबाड), त्रिमूर्ती लेन - एलबीएस मार्ग, पेंडसे लेन, देवधर हॉस्पिटल ते सहकार सोसायटी, विष्णुनगर लेन नं. दोन, लेन नं. तीन, सहयोग मंदिर लेन, घंटाळी क्रॉस लेन, काका सोहनी पथ, राममारुती क्रॉस लेन, महर्षी कर्वे रोड, स्वामी विवेकानंद रोड, गावंड पथ, राबोडी - पहिली राबोडीनाका ते रेहमानी हॉटेल ते जनरल कबरस्तान प्रवेशद्वारापर्यंत, राबोडी - महापालिका व्यायामशाळा ते कत्तलखान्यापर्यंत, मदनलाल धिंग्रा मार्ग, खारटन रोड वसाहत येथील रस्ता, एम.जी. रोड येथील शिवतीर्थ सोसायटी ते नवनंदिनी सोसायटी, सानेगुरुजी पथ येथील अंबिका भवन ते सुनीता को-ऑप. सोसायटी, एम.जी. रोड येथील शिवानंद सोसायटी ते इंद्रप्रस्थ सोसायटी, गोखले रोड येथील ब्राह्मण सोसायटीजवळील कै. गांगल मार्ग, हितवर्धिनी पथ, गोल्डन पार्कनाका ते मुक्ताईमार्ग, कोटीलिंगेश्वर रोड बी केबिन, होली क्राॅस शाळेमागे ते काझी अपार्टमेंट ते दत्त मंदिर, गडकरी पथ क्रॉस रोड, कामधेनू प्रसाद इमारत ते मनसुबा इमारत, कळवा शिवाजी चौक ते कळवा मेडिकल ते सहकार बाझार इमारत, एसबीआय ते डॉ. मुंजे बंगला, विष्णुनगर, नौपाडा, सरस्वती स्कूल ते दया क्षमा शांती बिल्डिंग रस्ता आणि एदलजी रोड ते एलबीएस रोड आदी रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.