डोंबिवली : एकीकडे बंद घराची आणि दुकानांच्या शटरची कुलूप तोडून चोरट्यांकडून मुद्देमाल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना शहरातील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला रामनगर पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. मंगळवारी मध्यरात्री अर्धा तास हा थरार सुरू होता. मोहमद्द असगर शेख असे या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा झारखंडचा असून सध्या मुंबई, डोंगरी भागात राहतो.
पूर्वेतील टिळक रोडवरील आयसीआयसीआय बँकेच्या बाहेरील एटीएम एक जण फोडत असल्याची चाहुल स्थानिक रहिवाशांना लागली. त्यांनी त्याची माहिती कल्याण पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. तेथून ही बाब रामनगर पोलिसांना कळविण्यात आली. त्यावेळी ड्युटीवरील सहायक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे आणि हवालदार निवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान एटीएम फोडून त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न असफल झालेल्या चोरट्याने तेथून धूम ठोकली होती. त्याने टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटीएम फोडण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो देखील असफल ठरला. तेथून पलायन करणारा चोरटा सूर्यवंशी आणि दाभाडे यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी लागलीच त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला. अर्धा तास हा पाठलाग सुरू होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
एक दिवसाची कोठडी
आरोपी शेख याच्या अंगझडतीत स्क्रू डायव्हर सापडला आहे. त्याला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे, अशी माहिती उपनिरीक्षक दीपक दाभाडे यांनी दिली. तो सराईत गुन्हेगार असून त्याने अजून कुठे चोऱ्या केल्या आहेत का, त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
-------------------