ठाणे: वागळे इस्टेट, इंदिरानगर भागातील एका घरात चोरी करणाºया विरेंद्र छेदिलाल तिवारी (४७ ,रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाण्यातून तर अनुराग हिरामणी गुप्ता (३०) याला उत्तरप्रदेशातून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून रोकड, दागिने आणि मोबाईल असा ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वागळे इस्टेट, इंदिरानगर, रायगड गल्ली येथील मोहिते किराणा स्टोअर्स हे दुकान फोडून चोरटयांनी ६६ हजार रुपये ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हाही दाखल झाला होता. यामध्ये कोणताही धागादोरा नसतांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संभाजी मोहिते, पोलीस उप निरीक्षक प्रमोद पाटील आणि जमादार माणिक इंगळे आदींच्या पथकाने खबरी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मासुंदा तलाव भागात चोरीचा माल विक्रीसाठी आलेल्या आरोपी विरेंद्र तिवारी याला सापळा रचून २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.
त्याच्याकडील सखोल चौकशीमध्ये अनुराग हिरामणी गुप्ता (३०) हा त्याचा साथीदारही चोरीचा काही माल घेऊन त्याच्या मुळ गांवी उत्तरप्रदेशमध्ये रेल्वेने पळून गेल्याची माहितीही त्याच्या चौकशीत समोर आली. त्याच आधारे श्रीनगर पोलिसांच्या अन्य एका पथकाने उत्तरप्रदेशातील कानपूर भागातून रेल्वे पोलिसांच्या मदतीने अनुराग गुप्ता यालाही चोरीच्या मुददेमालासह अटक केली. या दोघांकडून चोरीतील ३१.२३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह ९२ हजार ५०० रुपयांचा हस्तगत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.