भिवंडी : भिवंडीत जबरी चोरीसह मोबाईल व चैन स्नाचिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असताना गस्ती वरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी गुरुवारी दिली आहे. रशिद अब्बास शेख वय २७ व वसीम रशिद शेख वय २० दोघे रा.नवीवस्ती भिवंडी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली नाका येथील उड्डाणपूला जवळ पडघा येथील टेम्पो चालक तसलिम इब्राहीम अंसारी हे आपला टेम्पो रस्त्याकडेला उभा करून आराम करीत असताना रात्री एक वाजताच्या सुमारास दोघा चोरट्यांनी त्यांच्या टेम्पोत शिरून तसलिम जवळील मोबाईल खेचून आपल्या दुचाकी वरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. टेम्पो चालक तसलिम याने त्यांच्या दुचाकीस मागील बाजूने पकडून ठेवल्याने त्यांच्यात झटपट होऊन दुचाकीवरील चोरटे खाली पडले. या गदारोळात नारपोली पोलीस ठाण्यातील महामार्गावरील गस्ती पथकातील पोलीस कर्मचारी बारेला व ठोंबरे हे त्या ठिकाणी धावून येत त्यांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत त्यांची दुचाकी, चार मोबाईल व एक चाकू असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालक तसलिम अन्सारी याच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी चेतन पाटील, प्रशांत आवारे, पोउपनिरी रोहन शेलार, पोहवा जयराम सातपुते, हरिष हाके, सुशिल इथापे, समीर ठाकरे,राजेश पाटील, लक्ष्मण सहारे, संदीप जाधव, सागर म्हात्रे, मनोज बारेला, जनार्दन बंडगर, ठोबरे या पथकाने आरोपींकडे कसून चौकशी केली असता नारपोली पोलीस ठाणे हद्दीत ७ सप्टेंबर रोजी अंजुरफाटा ते कशेळी रस्त्यावर एकास लुबाडणूक करीत त्यावर चाकू हल्ला केल्याचा गुन्हा याच आरोपींनी केल्याचे उघड केले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.