डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील ‘इंद्रप्रस्थ’ या बंद बंगल्यात बुधवारी पहाटे चोरट्यांनी चोरी करीत तेथील तिजोरी पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरातील निवासी भागातील बंगल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचनेनुसार, येथे रात्रीच्या वेळेस रखवालदाराची नेमणूक केली आहे. याउपरही चोरीचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
इंद्रप्रस्थ बंगल्यात राहणारे अनिल मेहता हे पत्नीसह दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या अमेरिकेतील मुलाकडे राहण्यास गेले आहेत. चोरट्याने बुधवारी पहाटे ३ ते ३.१५ च्या दरम्यान त्यांचा बंद बंगल्याच्या परिसरात येऊन खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेली छोटी तिजोरी उचलून त्याने पोबारा केला. महत्त्वाचे म्हणजे आपले कृत्य सीसीटीव्ही कॅमे-यात कैद होऊ नये, यासाठी घरातील डीव्हीआर सोबत घेऊन गेला. परंतु, शेजारच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याची तिजोरी उचलून नेतानाची छबी कैद झाली आहे. या तिजोरीत ६५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, २५ हजारांची रोकड, ५० ग्रॅमचा चांदीचे ताम्हण दिवा तसेच बँक लॉकर आणि कारच्या चाव्या व महत्त्वाची कागदपत्रे होती. ही वजनदार तिजोरी घेऊन जाण्यासाठी चोरट्याने वाहनाचा वापर केला असावा, असा अंदाज मांडला जात आहे. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला असून तपास चालू केला आहे.
----------------------