उल्हासनगर : कॅम्प नं-४, भाटिया चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गहाण ठेवलेले दागिने सोडून रिक्षाने जात असतांना, मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी दागिने ठेवलेली पिशवी खेचून पोबारा केला. पिशवी घट्ट पकडून ठेवल्याने आशा दिनेश कोमरे धावत्या रिक्षातून पडून जखमी झाल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४, भाटिया चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत २ लाख ८० हजाराचे गहाण ठेवलेले दागिने आशा दिनेश कोमरे यांनी सोडून दागिने एका पिशवीत ठेवले. हातात दागिन्यांची पिशवी घेऊन त्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसल्या. रिक्षा कुर्ला कॅम्प रस्त्यांनी जात असतांना रिक्षा मागून एक मोटरसायकल भरधाव वेगाने आली. शांती सागर हॉटेलच्या समोर मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने महिलेच्या हातातील दागिन्यांची पिशवी जोरदारपणे हिसकली. तेंव्हा आशा कोमरे या रिक्षातून खाली पडल्या. मात्र पिशवी चोरट्यांच्या हातीं लागल्याने, त्यांनी पिशवी घेऊन पोबारा केला. रिक्षातून आशा कोमरे पडल्याने, जखमी झाल्या असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.