ठाणे : कधीही न ऐकलेल्या, वाचलेल्या प्रसिध्द कवींच्या कवितांचा "क" हा प्रयोग सहयोग मंदिर येथे कोलाज तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगात जेष्ठ कवी अशोक नायगावकरांच्या अनहर्ड, अनरेड कवितांचे वाचन नायगावकरांसोबत नव्या दमाचे कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे आणि पंकज दळवी यांनी केले.
डावे उजवे, शाकाहारी, टिळक या नायगावकरांच्या लोकप्रिय कविता टाळून उपहासात्मक आणि अंतर्मुख करणा-या कवितांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. मिडल क्लास कुटूंबातील पती पत्नीच्या प्रेमळ नात्याचे चित्रण नायगावकरांच्या आठवणी या कवितेतून घडले. या निमित्ताने त्यांच्या कवितेची तरल बाजूही समोर आली. अशीच तिंबत कणीक रहा तू, ज्योतिबा आभार या कवितांतून नायगावकरांनी समाजातील दांभिकतेवर अचूक बोट ठेवेले. हाच धागा पकडत संकेत म्हात्रे यांनी तू कर सत्कार तूला दिलेल्या व्रणांचे म्हणत एका गृहिणीचं घराभोवती फिरणारं आणि त्यातच समाधान मानायला लावणारं आयुष्य रेखाटलं, तर गीतेश शिंदे यांनी नवरा वारल्यावर या कवितेतून नवरा गेलेल्या बाईच्या मनाची घुसमट व्यक्त केली. पंकज दळवी यांनी नथूरामचं बॅडलक या कवितेतून हरवलेल्या तत्त्वांचा आणि गांधीवादाचा शोध घेतला.
या प्रसंगी या तिनही कवींनी नायगावकरांना विविध प्रश्न विचारून त्यांचा कवितेचा प्रवास उलगडला. कवितेने मनोरंजनही व्हायला हरकत नाही पण कवीचा आतला सूर सच्चा हवा त्यामुळेच कार्यक्रमात भरभरून हसणारा प्रेक्षक घरी जाताना मात्र अंतर्मुख झालेला असतो अशा भावना नायगावकरांनी व्यक्त केल्या. त्यांच्या अभिमान या कवितेने उपहासाचा सूर इतका टिपेला नेला की माणूस असण्याचा अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटावी अशी भावना निर्माण झाली. निसर्गाचा घोटाळा या कवितेने निसर्गाकडे वेगळ्या चष्म्यातून बघायला भाग पाडले. भोपाळ चिकित्सा, केशवसूत म्हणाले, मूळाक्षरं या कवितांनी शेवटाकडे कार्यक्रमावर चढवलेल्या कळसाला प्रेक्षकांनी टाळ्यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमास अरूण म्हात्रे, अशोक बागवे, महेश केळूसकर, राजीव जोशी असे जेष्ठ कवी देखील प्रेक्षकांत उपस्थित होते. या निमित्ताने कोलाज तर्फे ह्या मान्यवरांच्या हस्ते नायगावकरांचा एक हृदय सत्कारही करण्यात आला. लवकरच ’क’चा नायगावकर विशेष हा पुढील प्रयोग रत्नागिरीस होणार असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले.