भिवंडी : मुसळधार पावसामुळे सलग तिसºया दिवशीही भिवंडी पाण्याखालीच होती. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने भिवंडी जलमय झाली होती. तर, भिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा महामार्गावर पाणी आल्याने वाहतूककोंडी झाली होती. २६ जुलै २००५ नंतर प्रथमच वडघर गावाजवळ हा महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनांना वाट दाखवण्यात आली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकी वाहनांसह हलक्या वाहनांना या मार्गावरून जाण्यास मनाई करण्यात आली होती.महामार्गावरच्या दुतर्फा पाणी साचल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. याच भागातील डुंगे गावात पाणी शिरल्याने सकाळपासूनच नागरिकांनी दैना उडाली होती. पाण्याचा वाढता जोर लक्षात घेता डुंगे गावातील सखल भागांत असलेल्या घरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून परिवारासह जीवनावश्यक वस्तू व सामान थेट होडीतून सुरक्षितस्थळी हलवले.वडघर, डुंगे, कारिवली या सखल भागांत पाणी साचल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शहरात शिवाजी चौक, वंजारपट्टीनाका, म्हाडा कॉलनी, शेलार, खाडीपार, बंदर मोहल्ला, ईदगाह रोड, नझराना, पद्मानगर, कल्याणनाका, तीनबत्ती आदी भागांमध्ये पावसाचे पाणी घर व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले होते. कोनगावातही दुर्गाडी येथील खाडी दुतर्फा वाहत असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. दुपारपासून पावसाने उसंत घेतली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्याने भिवंडी शहरासह ग्रामीण भागांत पाणी शिरले होते. शहरातील निजामपुरा पोलीस चौकी पाण्याखाली गेली होती. तसेच पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या भाजी मार्केटमध्ये पाणी शिरल्याने भाजीविक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे एरव्ही रविवारी गर्दी असलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता.मनपाचा सतर्कतेचा इशारादरम्यान, खाडीकिनारी राहणाºया नागरिकांना महसूल विभागासोबतच मनपा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. भिवंडी महापालिकेचे आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी स्वत: नदीनाका व शिवाजी चौक परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी केली आहे. नागरिकांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा तत्काळ पुरवण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या आहेत.
तिसऱ्या दिवशीही भिवंडी पाण्याखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:09 AM