श्याम धुमाळ, कसारामुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा रेल्वे स्थानकावर व परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच प्रवासी सुरक्षा राखण्यासाठी २० सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.कसारा रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या, मुंबईहून यूपी, एमपीसह लांब पल्ल्यांच्या धावणाऱ्या रेल्वे मेल, एक्स्प्रेस गाड्या थांबत असतात. दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. उपनगरीय लोकल सेवेचे शेवटचे स्थानक असलेल्या कसारा रेल्वे स्थानकावर गर्दुल्ले, भिकारी व टपोरी तरुणांची कायम रेलचेल असायची. त्याप्रमाणे नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर कसारा रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता या वर्षी कसारा स्थानकावर २० कॅमेरे लावण्यात आले असून रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणाही कार्यरत केली आहे.फलाट क्र. १ ते ४ वर आरपीएफची गस्त सुरू आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून कसाऱ्यातील प्रवासी, ग्रामस्थ यांच्याकडून रेल्वे स्थानकात सुरक्षेसाठी पोलीस गस्त व कॅमेरे बसविण्याची मागणी आजमितीस पूर्ण करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. परिणामी, उपरोक्त मागणीसह प्रवाशांनी कसारा लोकल वाढविण्यात याव्यात. भुसावळ-पुणे, नांदेड-मुंबई या मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, मनमाड-इगतपुरी ही शटल कसाऱ्यापर्यंत वाढवावी, अशी मागणी केली होती. या उपरोक्त गाड्यांबाबत रेल्वे प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्यास रेल्वेचे उत्पन्न वाढू शकतेच. परंतु, प्रवाशांची गैरसोयदेखील दूर होऊ शकते. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजपावेतो अनेक मागण्या धूळखात पडत असल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)
कसारा स्टेशन परिसरावर तिसऱ्या डोळ्याची नजर
By admin | Published: August 05, 2015 12:32 AM