नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या प्रदेशातील प्रस्तावित केलेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या अनेक धरणांंची कामे सिंचन घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्या वाढीव आणि प्रस्तावित कामांंची निविदा प्रक्रिया २०१६ पासून थांंबविण्यात आली होती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्लीन चिटनंतर ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
यात ठाण्यासाठी शाई धरणासह सुसरी, काळ, चणेरा, शिरसिंगे आणि जामदा धरणांचा समावेश आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर १२ प्रकल्पांची चौकशी करण्यात आली. त्यात या सहा प्रकल्पांत घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध झाल्यानंंतर मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या धरणांची कामे करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार, जलसंपदा विभागाने या सहा धरणांची कामे करण्यास २२ डिसेंबर रोजी अनुमती दिली. शहरी भागातच आजघडीला पाण्याची सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतकी टंचाई जाणवत आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११ हजार २७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. यामुळे या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे.
ही धरणे अडकली होती चौकशीच्या फेऱ्यात
सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली. मात्र, अनेकांंची जमीनच संपादित झालेली नाही. तर कोंढाणे, बाळगंगा, शाई, सुसरी, काळ, शिरसिंंगे, जामदा ही धरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. परंतुु, आता ती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगरांना दिलासा
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतजमिनीसह वनजमिनीवर पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही धरणे आकार घेणार आहे. मुंबई पालिकेने गारगाई धरण रद्द केले आहे. सुसरी, शाई धरणांची कामे करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने दिलासा मिळणार आहे. ‘शाई’साठी तर ठाणे पालिकेने निधीची तयारी दर्शविली आहे.