अंबरनाथ : मलंगगडाच्या पायथ्याशी रेल्वे प्रशासनाचा जीआयपी टँक आहे. या धरणातून रेल्वेस्थानकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, रेल्वेस्थानकात पर्यायी पाण्याची व्यवस्था झाल्याने या धरणातील पाणी तसेच पडून राहिले होते. अखेर, या धरणाच्या पाण्यावर रेल नीरचा प्रकल्प उभारण्यात आला. रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या या प्रकल्पासाठी धरणाचे पाणी वापरले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या शेजारीच असलेल्या काकोळे गावाला मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गावात नळपाणीयोजना ही केवळ नावाला राबवण्यात आली. नळ आहेत पण पाणी नाही, अशी अवस्था या गावाची झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी जीआयपी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या गावातील महिला आणि आदिवासीबांधव हे एक किलोमीटर अंतर कापून धरणातील पाणी आणण्यासाठी जातात.
धरणाच्या काठावरील पाणी हे अशुद्ध असल्याने महिलांनी या धरणाच्या पाण्याच्या पात्राशेजारी लहान खड्डे तयार केले असून या खड्ड्यांत येणारे शुद्ध पाणी भरून त्यावरच आपली तहान भागवतात. देशातील रेल नीर प्रकल्प ज्या गावात आहे, त्या गावालाच पाणी मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही कोणताच उपाय योजला जात नसल्याचे समोर आले आहे.
धरणासाठी जागा देऊनही पाणी नाहीकाकोळे गाव हे अंबरनाथ एमआयडीसी आणि अंबरनाथ शहराला लागून असलेले गाव. या गावातील जीआयपी धरणाच्या पायथ्यापासूनच वालधुनी नदीचा उगम होतो. मात्र, ज्या गावातून वालधुनी वाहते, त्या गावाला पाणी नाही, हे वास्तव समोर आले आहे. ज्या गावांनी आपली जागा धरणासाठी दिली, त्यांनाच पाणी नाही. स्थानिक प्रशासनही या धरणातील पाणी या गावाला उपलब्ध करून देत नाहीत. या गावातील विहीरही कोरडी पडली आहे. ही विहीर स्वच्छही केलेली नाही. नळाला पाणी नाही आणि गावातील विहिरीलाही पाणी नाही, अशा स्थितीत नागरिकांनी करावे तरी काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या ताब्यातील जीआयपी टँकवरील पाण्यावर प्रक्रिया करून बाटलीबंद पाणी तयार केले जाते. देशातील सर्वात मोठा हा रेल नीर प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काकोळे गावात मात्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजही या महिलांना भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धरणातील पाणी भरावे लागत आहे.