ठाणे/कल्याण/डोंबिवली : थर्टी फर्स्टच्या रंगील्या रात्रीचा जल्लोष साजरा करण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे ढाबे, हॉटेल सज्ज झाली आहे. नाताळनिमित्त चर्चवर रोषणाई केली आहे. शिवाय मॉल, हॉटेल, दुकानांनीही रोषणाई केल्याने नोटाबंदीच्या काळातही सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह सर्वत्र दिसतो आहे. यंदा शनिवार-रविवारी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी असल्याने यंदाच्या जल्लोषाला सुट्यांचीही किनार आहे.वेगवेगळे गट, क्लब, जिमखान्यांत जसे सरत्या वर्षाच्या निरोपाच्या आणि नववर्षाच्या जल्लोषाच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे, तसाच उत्साह तरूणांच्या ठिकठिकाणच्या गटांत दिसतो आहे. महिला, मुले, ज्येष्ठांनीही आपापल्या पार्ट्या आयोजित केल्या आहेत. निरोप आणि स्वागताची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असली, तरी त्यातील उत्साह मात्र कायम आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत ढाबे, हॉटेलवर नुकतीच कारवाई झाली. त्यानंतरही हॉटेल-ढाब्यांनी तयारी करून, आवश्यक ती दुरूस्ती करून ग्राहकांच्या स्वागताची तयारी केली आहे. काही शाळांना नाताळच्या सुट्या असल्याने पर्यटनासाठी गोवा, कोकण, माथेरानला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, शहापूरमधील फार्म हाऊस फुल्ल आहेत. (प्रतिनिधी)
थर्टी फर्स्टचा जल्लोष शिगेला
By admin | Published: December 31, 2016 3:48 AM