ठाणे - रिक्षावाला किंवा सर्वसामान्य नागरिकांचा प्रामाणिकपणा आपण ऐकून किंवा पाहून आहोत. दरम्यान, कचरा वेचणाºयाचाही प्रामाणिकपणा आता ठाण्यात समोर आला आहे. रेल्वेलाइनवर मिळाली पर्स आणि त्यातील चक्क ३२ हजारांची रोकड विश्वजित गुप्ता याने मंगळवारी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील रेल्वे प्रवासी महिलेला परत करून आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.घोडबंदर रोड येथे राहणाºया अक्षता मंगळवारी दुपारच्या सुमारास लोअर परेल येथून ठाण्यात येण्यासाठी निघाल्या होत्या. सुरुवातीला त्या लोअर परेल येथून परेल स्टेशनवर आल्या. तेथून त्या धीम्या लोकलने दादर येथे उतरल्या आणि दादर येथून त्यांनी आसनगाव ही जलद लोकल पकडली. मात्र, ऐन कामावरून परतणाºया चाकरमान्यांच्या गर्दीत त्या सापडल्या. याचदरम्यान, ठाण्यातील फलाट क्रमांक -५ येथे उतरताना लोकलमध्ये चढण्यासाठी अचानक गर्दी वाढली. त्यामुळे उतरण्याच्या घाईगडबडीत त्यांची पर्स गर्दीत पडली. परंतु, ती नक्की कुठे पडली, हे लक्षात येत नसल्याने त्या पुन्हा त्या लोकलमध्ये चढल्या. दरम्यान, त्यांनी पर्स पडल्याची माहिती आपल्या सहकाºयाला दिली. तो त्या फलाट क्रमांक ५ येथे पर्सचा शोध घेत असताना एक कचरा वेचणारा विश्वजित त्यांना दिसला. त्याच्याकडे ती पर्स असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने पर्स मागितली असता विश्वजितने मात्र पर्स ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे जमा केली.विश्वजितने जमा केलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला ओळख पटवण्यास सांगून ठाणे रेल्वे उपप्रबंधक विजय रजक यांच्या हस्ते परत करण्यात आली. त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली. यापूर्वीही पारसिक बोगद्याजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून एक बॅग पडली होती. त्यामध्ये जवळपास लाखो रुपयांचा ऐवज होता. ती बॅगही रेल्वे प्रशासनाने तातडीने परत केली असल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रबंधक सुरेंद्र महिधर यांनी दिली.
ठाण्यात कचरा वेचणाऱ्याने परत केली ३२ हजारांची रोख रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:46 AM