ठाणे - आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही, मात्र हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, त्यामुळे ते टिकणारच असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला आहे. काही लोकांना ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही की एकनाथ शिंदे कसा हा डोलारा सांभाळतील मात्र बाळासाहेब ठाकरे आणि या आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळावर येऊन त्यांनी आनंद दिघें यांना अभिवादन केले. त्यानंतर आनंद दिघें यांच्या आठवणींना उजाळा देताना विरोधकांचाही समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघें आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उघडू शकत नाही. त्यांचा त्याग आपण पहिला. बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांनी पोहचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिली. त्यांचं आपल्यातून निघून जाणं ही वेदना आहे आपण जो इतिहास घडवला त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे.
कठीण अशी लढाई लढलो. हितचिंतक आणि राजकारणी लोकांना त्यावेळी धास्ती वाटली. मात्र लढाई साधी नव्हती, पण जिंकलो. दिघेंचं स्वप्न होतं की ठाण्याच्या मुख्यमंत्री होईल आणि ते स्वप्न पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. मला अभिमान आणि समाधान आहे माझ्या गुरूच्या आशीर्वादाने पल्ला गाठला .या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही मात्र सरकार लोकांचं आहे, कोणाला ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही.एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील अशी धास्ती अनेकांना होती मात्र आपल्या पोटात आणि ओठात एकच आहे हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमचा अजेंडा काहीच नाही, सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.