ठाणे : ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे 'जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार' व 'गंगा-जमुना' पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा 'जनकवी पी. सावळाराम' पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना तर 'गंगा-जमुना' पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कलासमिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'संगीत', 'अभिनय', 'शिक्षण', 'साहित्य' अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच नवोदित कलावंताना प्रोत्साहन मिळावे यासाठी 'उदयोन्मुख कलावंत' हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे.
२०२३ चा 'जनकवी पी. सावळाराम पुरस्कार' ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात येणार असून ७५ हजारांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. गं'गा –जमुना पुरस्कार' अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले यांना देण्यात येणार असून ५१ हजाराचा धनादेश, स्मृतीचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्रा. मंदार टिल्लू व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना देण्यात असून २५ हजारांचा धनादेश, स्मृतचिन्ह व शाल असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.
या कार्यक्रमास जनकवी पी. सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच रसिकांसाठी जनकवी पी. सावळाराम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.