- पंकज पाटीलबदलापूर - कोंडेश्वरला पर्यटकांची होणारी गर्दी पाहता या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. जे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी उंचावरून कुंडात उडी मारतात, त्यांना आळा घालण्यासाठी काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता वाहत्या पाण्याखालीच भिजण्याचा आनंद घेता येणार आहे.मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागांतील असंख्य पर्यटक धबधब्यावर भिजण्यासाठी कोंडेश्वरला येतात. निसर्गरम्य वातावरण आणि हिरव्यागार वनराईसोबत धबधब्याचा आनंद घेणे पर्यटक पसंत करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत कोंडेश्वर धबधब्यावर दारू पिऊन कुंडात उडी मारणाऱ्या अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन वर्षांपासून या कुंडाभोवती काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. ही उपाययोजना केल्यापासून पर्यटकांचे जीव मोठ्या प्रमाणात वाचले होते. पावसाळा संपल्यावर या तारेचे कुंपण तोडण्यात येते. मात्र, यंदा पुन्हा तारेचे कुंपण घालत पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. सुरुवातीला तार तुटल्याने यंदा पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही तार पुन्हा बसवण्यात आल्याने पर्यटकांना उंचावरून उड्या मारणे शक्य होणार नसल्याचे पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने कोंडेश्वर धबधब्याने धोक्याची पातळी गाठली होती. मात्र, पुन्हा पाऊस कमी होताच पर्यटकांची गर्दी धबधब्यावर वाढली आहे. या वाढलेल्या गर्दीवर देखरेख करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. मात्र, शनिवारच्या मुसळधार पावसात मात्र धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. मात्र, रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांची गर्दी वाढली होती. या ठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून काही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पोलीसमित्र म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. हे पोलीसमित्र पर्यटक आणि त्यांच्या सुरक्षेवर देखरेख करणार आहेत.कोंडेश्वरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणकोंडेश्वर धबधब्यावर भिजण्यासाठी शेकडो पर्यटक येत असल्याने बदलापूर-खरवई ते कोंडेश्वर हा रस्ता पूर्ण खचला होता. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी एमएमआरडीएकडे दिला होता. त्यानुसार, संपूर्ण ग्रामीण भागातील कोंडेश्वर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. या रस्त्यामुळे पर्यटकांना सहज धबधब्याच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होत आहे.भोज धरणावरही पर्यटकांची गर्दीअंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वरला लागूनच असलेल्या भोज धरणावरही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोंडेश्वर धबधब्यातून वाहणारे पाणी हे थेट भोज धरणात जाते. त्यामुळे भोज धरण भरल्यावर त्याच्या बंधाºयावरून वाहणाºया पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात. भोज धरण भरून वाहू लागल्याने आता या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी वाढत आहे.ग्रामस्थ करतात पर्यटकांची लूटकोंडेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी येणाºया प्रत्येक दुचाकीस्वाराकडून १० रुपये आणि चारचाकी चालकांकडून २० रुपये घेतले जात आहेत. हे पैसे वसूल करण्याबाबत रीतसर कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नसताना काही तरुण मर्जीप्रमाणे पावती फाडत असल्याने त्यांच्यावर योग्य ते निर्बंध घालण्याची मागणी पर्यटक करत आहेत. हे पैसे नेमके कुणाच्या परवानगीने वसूल केले जात आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ही पावती पर्यटकांसाठी ऐच्छिक करावी, अशी मागणी केली जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काटेरी जाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:22 AM