भाईंदर : अंधेरी रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांना सापडलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका शाळेतील चौथीत शिकणाऱ्या दोन शालेय विद्यार्थिनींचे अपहरण झाले नव्हते, असे नवघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्या स्वत:च गेल्या होत्या, असे निदर्शनास आले आहे. परंतु, या घटनेने खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे.मंगळवारी रात्री अंधेरी रेल्वेस्थानकावर दोन लहान शालेय गणवेशातील मुली रेल्वे पोलिसांना दिसल्यामुळे त्यांनी त्वरित दोघींची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलींनी शाळेतून सुटल्यावर बाहेर एका अनोळखी व्यक्तीने तुम्हाला तुमच्या आईकडे घेऊन जातो, असे सांगून रिक्षात बसवले. तसेच आई अंधेरी रेल्वेस्थानकात थांबली आहे, असे सांगून लोकलच्या महिलांच्या डब्यात बसवले, असे सांगितले. रेल्वे पोलिसांनी नवघर पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. मुलींना पालकांच्या स्वाधीन केल्यावर पोलिसांनी अपहरणाचा प्रकार म्हणून तपास सुरू केला.शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात या दोघी मुलीही शाळेतून सायंकाळी बाहेर पडल्या. सीसीटीव्हीमध्ये एकीचे वडील दुचाकी घेऊन शाळेबाहेर वाट बघत थांबले होते, तेही दिसले.त्या अंधेरीला गेल्या कशा हा प्रश्न अनुत्तरीत- मुलींनी मुख्य रस्त्यावर जाऊन रिक्षा पकडली. रिक्षा पकडून त्या भार्इंदर रेल्वेस्थानकात गेल्या. स्वत: मुलींनी तिकीट काढून त्या फलाटावर पोहोचल्या. फलाटावर काही वेळ होत्या. नंतर, त्यांनी लोकल पकडली.- हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये आला असून त्यांच्यासोबत कोणी अनोळखी व्यक्ती आढळली नसल्याचे नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले. परंतु, पोलिसांचा तपास सुरू असून अपहरणाचे पुरावे अजून आढळलेले नाहीत. अपहरण झाले नाही, तर मग या दोघी मुली अंधेरीला गेल्या कशाला, याचे उत्तर मात्र अजून सापडलेले नाही.- शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण किंवा पळवून नेण्याच्या घटना घडत असतात.यामुळे पालकांनीही पाल्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ते कुठे जातात, मित्रमैत्रिणी कोण याची माहिती असली पाहिजे असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
‘त्या’ मुलींचे अपहरण नव्हे, त्या स्वत:च गेल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:16 AM