पंकज रोडेकर ठाणे : घरी अठरा विश्व दारिद्रय असल्याने मुलींनी चांगले शिकावे, यासाठी त्यांना शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार आई सांगून कधीतरी रागवायची, म्हणून अंबरनाथ येथील दोन सख्ख्या बहिणी दिवाळीच्या तोंडावर निघून गेल्या. अवघ्या १२ आणि ५ वर्षांच्या या चिमुरड्या मानखुर्द येथे सापडल्यानंतर ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमुळे पुन्हा सुखरूप घरी परतल्या.अपहरण झालेली मुलेमुली तसेच बालगृहात दाखल असलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोनावणे यांच्या पथक ातील पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे आणि पोलीस नाईक रोहिणी नाईक या दोघी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे १५ दिवसांपासून असलेल्या रूपाली (१२) आणि गौरी (५) या सख्ख्या बहिणी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या बहिणींचा विश्वास संपादन करून त्यांना बोलते केले. सुरुवातीला त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर, आपण गरीब घरातील मुली असून आईवडील आणि मोठी बहीण असा आमचा परिवार असल्याचे सांगितले. तसेच वडील मजुरी आणि आई घरकाम करते. घरची गरिबी असल्याने आई आम्हाला शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार सांगून कधीतरी रागावते. त्यामुळे आम्ही घरातून बाहेर पडलो. अंबरनाथ रेल्वे स्थानकात आल्यावर मुंबईकडे जाणाºया लोकलमध्ये बसल्यावर आम्हाला कल्याण येथे लहान मुलांसाठी काम करणाºया एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी पकडले. तेथून त्यांनी आम्हाला मानखुर्द येथे आणल्याचे सांगितले. त्याचबरोबर अंबरनाथ फॉरेस्टनाका, हनुमान मंदिर पाइपलाइन येथे राहत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानुसार, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतल्यावर त्या तेथेच राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, शुक्रवारी रात्री त्या बहिणींना पालकांच्या स्वाधीन करण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केल्याचे पोलीस म्हणाले.
‘त्या’ हरवलेल्या बहिणी सापडल्या , आई रागावल्याने सोडले होते घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:39 AM