ठाणे : देशपातळीवर युती झाली असतानाही ठाण्यात मात्र शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. सत्ता असतानाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याचे भांडवल करून भाजपाने पुन्हा शिवसेना उमेदवाराविरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार, फेसबुकवर भाजपाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी एक मेसेज टाकून आपले मत सुशिक्षित उमेदवारालाच द्या, असे आवाहन केले आहे. या पोस्टमुळे युतीत पुन्हा ठिणगी पडली आहे.काही दिवसांपूर्वी शहरात एक बॅनर लागले होते. आपला खासदार कसा असावा, उच्चशिक्षित की अल्पशिक्षित, असे त्यावर लिहिले होते. यावरून, वादळ पेटले असतानाच शनिवारी भाजपाचे नगरसेवक अशोक राऊळ यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. विशेष म्हणजे राजन विचारे यांचे पुतणे मंदार विचारे यांनीच राऊळ यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून अशी ठिणगी पडल्याने भाजपाचे नगरसेवक संतापले आहेत. आधीच त्यांच्या २३ नगरसेवकांनी राजन विचारे यांच्याऐवजी दुसरा कोणताही उमेदवार दिल्यास त्यासाठी काम करू, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहे. त्यावर पडदा टाकण्याचे काम श्रेष्ठींकडून सुरूअसतानाच राऊळ यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने भाजपाचे नगरसेवक आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, पक्षाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाण्यातच काय कुठलाही खासदार किंवा लोकप्रतिनिधी शिक्षित असावाच. ठाण्याच्या बाबतीत तर तो आदरणीय रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे यांच्याबरोबर उभा राहू शकेल, असा तरी असावा, असे वाटते. ठाणे महापालिकेने किंवा एमएमआरडीएने केलेली किंवा ज्या कामांचा पाठपुरावा अनेक वर्षे किंवा अनेक जणांनी केलेला आहे, ते स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करणारा खासदार, आमदार नसावा, असे पाटणकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यानिमित्ताने त्यांनी राऊळ यांच्याविरोधातील रागही काढल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावरील ‘त्या’ मेसेजमुळे शिवसेना-भाजपात पुन्हा ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:44 AM