भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत १२ व २४ वर्षे सलग सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना त्यांच्या कालबाह्य पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने किमान सातवी उत्तीर्णची लागू केलेली अट नियमबाह्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे सुमारे २२० हून अधिक सफाई कामगारांना त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मीरा-भार्इंदर नगरपालिकेने १५ जुलै १९९१ रोजी स्थायी सफाई कामगारांची शेवटची भरती केली. त्यावेळी उमेदवाराला किमान लिहिता, वाचता येणे अनिवार्य होते. किमान शिक्षणाची अट शिथिल करण्यात आल्याने सुमारे सातशेहून अधिक कामगारांना भरती करून घेण्यात आले. यानंतर, वाढत्या शहरीकरणामुळे पालिकेने सफाई कामगारांच्या वाढीव पदनिर्मितीचा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला. त्याला राज्य सरकारने १९९७ मध्ये मंजूर करून ७०० पदनिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. दरम्यान, पालिकेने १९९५ पासून सफाई कामगार कंत्राटावर घेणे सुरू केले.सरकारने पदनिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर पालिकेने कंत्राटावर काम करणाºया ५३८ सफाई कामगारांना सेवेत कायम केले. तर, बहुतांश स्थायी सफाई कामगारांना प्रशासनाने शिपाईपदावर बढती देत त्यांची मूळ नियुक्ती ‘सफाई कामगार’ म्हणूनच कायम ठेवली. २८ फेब्रुवारी २००२ रोजी महापालिका झाल्यावर वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे चार हजार ५०० कामगारांची आवश्यकता निर्माण झाली. पालिकेत सध्या १९०० कंत्राटी, तर सुमारे १०० स्थायी सफाई कामगार आहेत. यातील स्थायी कामगार कार्यालयीन साफसफाईसाठी नियुक्त केले आहेत. त्यांच्यासह शिपाईपदावरील ८४५ स्थायी कामगारांची सेवा एकाच पदावर सलग १२ व २४ वर्षे झाल्याने त्यापैकी ६१६ कामगारांना प्रशासनाने सरकारच्या प्रगती योजनेंतर्गत कालबाह्य पदोन्नती व वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला. उर्वरित २२९ कामगारांना अद्याप पदोन्नतीपासून वंचित ठेवले. या कामगारांना पदोन्नती देण्यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी एका सल्लागाराची नियुक्ती केली होती.या पदोन्नतीसाठी सरकारी आदेशानुसार शैक्षणिक अट शिथिल केल्याने सर्वच लाभार्थी कामगारांना पदोन्नतीचा लाभ द्यावा, अशी मागणी विविध कामगार संघटनांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. तसेच २०१७ व २०१८ मध्ये अनुक्रमे राज्य तसेच केंद्र सरकारच्या सफाई कामगार आयोगाच्या अध्यक्षांनी सफाई कामगारांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. परंतु, प्रशासनाने त्याला छेद देत कालबाह्य तसेच वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी किमान सातवी उत्तीर्ण असल्याचा फतवा काढला.पालिका आयुक्तांशी झाली सकारात्मक चर्चामागणी करूनही प्रशासन दाद देत नसल्याने मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे स्थानिक अध्यक्ष अरुण कदम, पालिका युनिट अध्यक्ष गोविंद परब, सचिव कैलास शेवंते आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त बालाजी खतगावकर यांची नुकतीच भेट घेतली.२०१४ मध्ये सरकारने काढलेला सरकारी सेवा नियमातील किमान सातवी उत्तीर्णचा आदेश त्यापूर्वीच्या सफाई कामगारांना लागू होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर चर्चा झाल्यानंतर अखेर आयुक्तांनी त्या सफाई कामगारांना लवकरच वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यास अनुकूलता दर्शवली.
‘त्या’ सफाई कामगारांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:27 AM