लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या दोन दिवसांच्या त्या दोन नवजात बालकांना अखेर ऑक्सिजन मिळाले. मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमार्फत त्या दोन बालकांसाठी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात आले.
या नवजात बालकांना काही तासांचे ऑक्सिजन शिल्लक आहे, असे समजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ.ओमकार माळी यांनी गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीने काही तासांतच ऑक्सिजन सिलिंडर मिळवून दिले.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली. दोन दिवसांच्या नवजात बालकांना व्हेंटिलेटरवर उपचारासाठी ठेवले होते. त्यांना सात-आठ तास पुरेल इतकेच ऑक्सिजन उपलब्ध होते. ऑक्सिजन सिलिंडर लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, म्हणून आम्ही पुरवठा करणाऱ्या कंपनीशी वारंवार संपर्कात होतो, परंतु रात्री १० वाजता त्यांनी आता उपलब्ध होऊ शकत नाही, असे सांगितले. तो सर्वांत कठीण काळ समोर होता, असे डॉ.दीपक चांगलानी यांनी सांगितले. त्यांनी डॉ.माळी यांना दोन दिवसांच्या बालकांना ऑक्सिजनची तातडीने गरज असल्याचे सांगितले. डॉ.माळी यांनी तातडीने गृहनिर्माणमंत्री आव्हाड याना सर्व परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दोन नवजात बालकांना ऑक्सिजनची गरज असल्याचे सांगितले. डॉ.माळी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना सर्व हकीकत सांगितल्यावर रात्री १२.४५ वाजता सिव्हिल सर्जन डॉ.कैलाश पवार यांचा फोन आला आणि काही तासांतच ऑक्सिजन सिलिंडर त्या बालकांसाठी उपलब्ध होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर, पहाटे चार वाजता त्या नवजात बालकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले.
रात्री आम्ही त्या दोन बालकांसाठी ऑक्सिजन पुरविले. माणुसकी म्हणून आम्ही जिथे गरज आहे तिथे मदत करतो. त्या चिमुकल्यांचे प्राण वाचणे महत्त्वाचे होते. - डॉ. कैलास पवार, सिव्हिल सर्जन
नवजात बालकांना काही तास पुरेल इतकेच ऑक्सिजन आहे, त्यांना तातडीने ऑक्सिजन हवे आहे, असा डॉ.दीपक यांनी फोन केल्यावर मी सुन्न झालो. मी लगेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोन केल्यावर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना फोन करून सिव्हिल सर्जन मार्फत ऑक्सिजन पुरविले. - डॉ. ओमकार माळी
गेले पाच ते सहा दिवस झाले ऑक्सिजन सिलिंडर पुरविणारी कंपनी सिलिंडर देण्यासाठी आडेबाजी करीत आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता त्यांनी सिलिंडर मिळू शकत नाही, असे सांगितले. त्या दोन चिमुकल्यांना ऑक्सिजन मिळण्यासाठी मी डॉ.माळी यांची मदत घेतली आणि काही तासांत प्रश्न सुटला, परंतु आणखीन तीन सहा महिन्यांची बालक आहे त्यांना कधीही गरज लागू शकते. - डॉ.दीपक चांगलानी