ठाणे : आणीबाणीच्या कालावधीत बंदीवान म्हणून शिक्षा भोगलेल्यांचे गेल्या दोन वर्षापासून मानधन बंद केले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्यांना पहिल्यापासून मानधन मिळत आहे. त्यांचे दरमहा दहा हजारांचे रखडलेल्या मानधनाची रक्कम बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून लवकरच वितरीत केली जात आहे.
'आणीबाणीत कारावास; मिळणार दहा हजार' या मथळ्याखाली लोकमतने वृत्तप्रसिध्द करून हा विषय ४ नोव्हेबर रोजी प्रसिध्द केला होता. त्याची दखल घेऊन या आणीबाणीतील बंदीवानांचे रखडलेले दोन वर्षांचे मानधन आता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. जिल्ह्यातील तब्बल ८८ जणांना या मानधनाचा लाभ होत आहे. दरमहा दहा हजार रूपयांचे मानधन मंजूर झाले आहे. यासह जिल्हह्यात एकूण ११० जणांची या मानधनासाठी राज्य शासनाने निवड केली आहे. त्यांना झालेल्या शिक्षक असनुसरून हे मानधन प्राप्त होत आहे. काहींना दहा हजार तर काहींना पाच हजार आदी रक्कम दरमहा मिळत असल्याचे जिल्हा प्रशासनाचा हवाला देत लोकतंत्र सेनानी संघाचे राज्य प्रवक्ते अनिल भदे यांनी लोकमतला सांगितले.
भारतामध्ये २५ जून १९७५ ते दिनांक ३१ मार्च १९७७ या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधित ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा दरमहा दहा हजार रूपयांचीआर्थिक मदत देत त्यांचा सन्मान, यथोचित गौरव शासनाने सुरू केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यानुसार अलिकडेच जिल्हा प्रशासनाला आठ जणांचे प्रस्ताव प्राप्त झाले.यासह जिल्हह्यात आता ११० जणांना या मानधनाचा लाभ होईल. मात्र कोरोना काळापासून बंद झालेले मानधन आता पुन्हा सुरू झाले आहे. तब्बल ८८ जण लाभार्थी असून त्यांच्या दोन वर्षांच्या रखडलेल्या मानधनासह अन्य लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे मानधन आता त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. यासाठी अधिकारी म्हणून सहकार्य केलेले तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार राजाराम तवटे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर आदींची भेट या आणीबाणी कालावधीच्या मानधन लाभार्थ्यांनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.