लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर मधील शिवसेनेच्या ३ व काँग्रेसच्या १ माजी नगरसेवकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश ओबीसी सेलच्या कार्यकारणी बैठक वेळी प्रदेश कार्यालयात शुक्रवारी पक्ष प्रवेश देण्यात आला . मात्र त्यातील दोघांना २०१९ मध्येच तर एकास वर्षभरा पूर्वीच भाजपात प्रवेश दिला असताना त्यांचा पुन्हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याने खिल्ली उडवली जात आहे .
भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यक्रमात मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश शुक्रवारी करण्यात आला . भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या वतीने शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपा मध्ये पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे .
वास्तविक हे सर्व माजी नगरसेवक असून त्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविका अनिता पाटील , दीप्ती भट व कुसुम गुप्ता तर काँग्रेसचे माजी नगरसेवक नरेश पाटील यांचा समावेश आहे . या पक्ष प्रवेश वेळी मेहतांसह मंत्री रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते .
यातील अनिता पाटील व नरेश पाटील यांचा भाजपा प्रवेश मार्च २०१९ मध्येच झालेला असून स्वतः मेहतानीच त्यांना पक्ष प्रवेश दिला होता . तर दीप्ती भट सुद्धा वर्षभरा पेक्षा जास्त काळा पासून भाजपा सेबत आहेत .
भट , पाटील ह्या भाजपाच्या कार्यक्रमात असतात व भाजपा म्हणूनच स्वतःची ओळख देतात . शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा सुरु करण्यात आली होती .
मुळात दीप्ती भट ह्या काँग्रेस मधून नगरसेविका झाल्यावर भाजपात गेल्या . भाजपातून नगरसेविका झाल्यावर शिवसेनेत गेल्या आणि सेनेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर पुन्हा भाजपात गेल्या . अनिता पाटील सुद्धा राष्ट्रवादीतून शिवसेना व सेनेतून भाजपात आल्या आहेत . तर नरेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस व तेथून भाजपात आले आहेत .
शिवसेनेच्या माजी नगरसेविका कुसुम गुप्ता ह्या सेनेत फूट पडल्यावर शिंदे गट व ठाकरे गट असे दोन्ही कडे पाय ठेऊन होत्या . मात्र त्यांना भाजपा कडे ओढण्यात मेहता यशस्वी झाले . वास्तविक कुसुम यांचा भाजपा प्रवेश हा शिवसेना शिंदे गटाला जास्त धक्का देणारा मानला जात आहे .
दरम्यान चार वर्षां पूर्वी भाजपात प्रवेश दिलेल्या अनिता पाटील व नरेश पाटील तर वर्षभरा पासून भाजपात असलेल्या दीप्ती भट यांना नवीन प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा भाजपात प्रवेश दिल्याने खिल्ली उडवली जात असून टीका देखील होत आहे .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"