कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने खासगी लॅबसोबत करार करून कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात कोरोना टेस्टची सुविधा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी एका व्यक्तीला कोरोना टेस्टसाठी तीन हजार रुपये आकारले जात होते. त्याला विरोध झाल्यानंतर महापालिकेने घूमजाव करत स्वखर्चाने टेस्ट करू इच्छिणाऱ्यांनाच हे शुल्क आकारले जात असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे शुल्क आकारणी प्रकरणी महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सुरुवातीला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात जावे लागत होते. १ एप्रिलपासून महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी मुंबईतील हाफकिन संस्थेत पाठवले जात होते. त्यासाठी कोणतेही शुल्क नव्हते. महापालिकेने आठ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू केले आहेत. कोरोनाची लक्षणे आढळणाºयांना भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रण येथे ठेवले जात असून स्वखर्चाने कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांना खासगी टेस्ट लॅब उपलब्ध केली आहे.
पिवळे व केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांची कोरोना टेस्ट मोफत केली जात आहे. आतापर्यंत डोंबिवलीतील कोविड शास्त्रीनगर रुग्णालयात व टाटा आमंत्रण येथे एक हजार ४९५ जणांची मोफत टेस्ट केली आहे. तर, खासगी लॅबमध्ये एक हजार ६५४ नागरिकांनी स्वेच्छेने टेस्ट केली आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी चार हजार ५०० रुपये आकारले जातात.
रुक्मिणीबाई रुग्णालयात क्रेष्णा डायग्नोस्टिक लॅब ही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तीन हजार रुपये शुल्क आकारत आहे. तरीही टेस्टसाठी जास्त पैसे उकळत असल्याचा कांगावा करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.
उपचारांचा खर्चही माफ करा !
टेस्ट आणि उपचार मोफत व्हावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील, भाजप आमदार गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागणी केली होती. टेस्टच्या शुल्क आकारणीप्रकरणी महापालिकेने घूमजाव केले असले तरी उपचाराचा खर्च अद्याप आकारला जात आहे. तोही जास्त असून तो माफ केला जावा, अशी मागणी या लोकप्रतिनिधींनी उचलून धरली आहे.